कोल्हापूर, 06 नोव्हेंबर : मागच्या काही वर्षांपासून ऊस वाहतूकदारांच्या डोक्यावर नवं संकट उभे राहिले आहे. ऊस तोडणीसाठी मुकादमांच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात येत असतात. दरम्यान ऊस तोडणी वाहतूकदारांकडून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या मुकादमांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उचल करतात. पण ज्यावेळी उसाचा हंगाम सुरू होतो त्यावेळी मुकादमांसह टोळ्या पळून जातात यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना लाखो रुपयांना चुना लागतो. यामुळे ऊस वाहतूक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काल कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे असे आवाहन करण्यात आले. मागच्या कित्येक वर्षांपासून मुकादम आमची फसवणूक करतात, ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पाठवत नाहीत यामुळे कारखान्यांकडून आमच्यावर कारवाई होते. आमचे तर पैसे बुडतातच अन् जप्तीसारखी कारवाई आमच्यावरच होते. त्यामुळे याबाबत निर्णय घ्या; अन्यथा आम्ही फास लावून घ्यायचा का? ते सांगा, असा आक्रोश ऊस वाहतूकदारांनी व्यथा मांडल्या.
हे ही वाचा : …तर मी विरोधकांसोबत जाणार, राजू शेट्टींनी सांगितलं मनातलं
मुकादम ही पद्धतच बंद करा, बांधकाम महामंडळाकडून ऊसतोड मजूर पुरवण्याबाबत नवी व्यवस्था निर्माण करा, त्याकरिता राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तर ऊस वाहतूकदारांची दरवर्षी कोट्यवधींची फसवणूक होत आहे, पोलिस प्रशासनही त्यांना सहकार्य करत नाही, यामुळे मुकादमांचे धाडस वाढत चालले आहे, ते रोखण्यासाठी संघटीत व्हा, असे आवाहन माजी आमदार उल्हास पाटील यांनी केले.
मुकादमांना ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीमालक उचल देत असतात. त्यानुसार कारखाना सुरू होताना या टोळ्या त्या-त्या कार्यक्षेत्रात आणायच्या असतात. मुकादम आणि मजुरांची खात्री करूनच कारखाना चालक वाहनधारकांना आगाऊ रक्कम देतात, त्यानंतरच ते मुकादमांना उचल देतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून काही मुकादम, मजूर जाणीवपूर्वक, संघटितपणे बनावट कागदपत्रांच्या आधारे, लाखोंच्या रकमा घेऊन पसार होत आहेत. त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर जीवितास धोका असतो. अशाच प्रकारे एका वाहनचालकाचा खूनही झाला आहे.
वाहनधारकांवरच मुकादम अथवा मजुरांच्या महिलांकडून विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ, अपहरण, खासगी सावकारी अशाप्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. ऊस वाहतूकदारांचे पैसे तर जातातच; पण गुन्हे दाखल झाल्यास त्याचा ससेमिरा मागे लागतो, त्यात कारखानेही आमचीच वाहने जप्त करतात. त्यात ही वाहने शेतजमिनी गहाण ठेवून, बँकांची कर्जे काढून घेतली आहेत, त्याचे हप्ते भरणेही कठीण होते. यामुळे काही वाहनधारकांनी आत्महत्याही केल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हे ही वाचा : राजू शेट्टी शिंदे सरकारवर भडकले, म्हणाले सगळे एका माळ्याचे मणी
मुकादमाच्या फसवणुकीला आळा बसला नाही, तर या परिस्थितीत वाढ होत जाईल, यामुळे याबाबत कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घ्यावा, फसवणूक करणार्या मुकादमांवर फौजदारी कारवाई व्हावी, तो आर्थिक, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात यावा, शासनाने वाहतूकदार, मुकादम यांची नोंदणी करावी, मुकादमांकडून वसुली होईपर्यंत बँका, वित्तीय संस्थांनी वाहनांची जप्ती, लिलाव स्थगित करावेत, फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास मुकादमाची संपत्ती जप्त करून त्याची वसुली व्हावी, मुकादम, मजूर आणि वाहतूकदार यांचे महामंडळ स्थापन व्हावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. याबाबत प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येणार असून, यानंतर याविरोधातील लढा निश्चित केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.