सांगली, 2 जुलै : मिरज (Miraj News) तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे (9 People Committed Suicide in Sangli). या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट सोलापूर) यांना अटक केली आहे.
दरम्यान या प्रकरणात मोठा उलगडा झाला आहे. या मांत्रिकाने वनमोरे कुटुंबातील सदस्यांना विष दिल्याची माहिती समोर आली आहे. 19 जून ही गुप्तधन मिळण्याची डेडलाइन ठरली होती. त्या दिवशी गुप्तधन मिळेल असं सांगून मांत्रिकाने वनमोरे कुटुंबातील 9 जणांना वेगवेगळ्या खोलीत थांबायला सांगितलं. यानंतर घरातील सर्व दिवे घालवण्यास सांगितलं. यानंतर प्रत्येक सदस्याला काळ्या चहातून विष देऊन त्यांचा खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून वनमोरे कुटुंब मांत्रिकाच्या संपर्कात होते. त्यांनी मांत्रिकाला अनेकदा पैसे दिले होते. मात्र गुप्तधन मिळत नसल्याने पैस परत देण्यासाठी वनमोरे कुटुंबाकडून मांत्रिकाकडे तगादा सुरू होता. शेवटी 19 जून रोजी आरोपी रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत म्हैसाळमधील वनमोरे कुटूंबाच्या घरी होते. आधी शिक्षक असललेल्या पोपट वनमोरे, त्यांच्या पत्नी, मुलगी यांना हा काळा चहा दिला. त्यानंतर पोपट यांचा मुलगा शुभमला घेऊन पशु डॉक्टर असलेल्या माणिक वनमोरेच्या घरी आले. तिथे माणिक वनमोरे, त्यांची आई, पत्नी, दोन्ही मुले आणि शुभमला चहा देण्यात आला. रात्रभरात हे कारस्थान यशस्वी झाल्याचं लक्षात येताच आरोपीने पहाटे 5 वाजता म्हैसाळमधून पळ काढत सोलापूर गाठलं.
आरोपी धीरजला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयाने 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अब्बासला अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता छातीत दुखत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यास डिस्चार्ज मिळताच अटक करून पुढील तपास केला जाणार आहे. दरम्यान मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटबाबत काहीच उघड होऊ शकलं नाही. ती नोट कोणी लिहिली याचाही तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.