कोल्हापूर, 22 डिसेंबर : भारतीय विमान प्राधिकरण व एअर इंडिया कंपनीकडून प्रवाशांची लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवस आधी तिकीट काढूनसुध्दा प्रवाशांना सीट उपलब्ध करून न देता ऐनवेळेस येणाऱ्या प्रवाशांना जादा दराने तिकीट विक्री करून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार राजरोसपणे घडत असल्याची तक्रार माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचेकडे केली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बाबतीत विमान प्रवासादरम्यान या गोष्टी घडल्यानंतर त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. एअर इंडिया कंपनीकडून याबाबत गेल्या दोन महिन्यात मुंबई ते भोपाळ व आज दिल्ली ते पुणे या प्रवासादरम्यान असा प्रकार घडून आला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी 18 ॲाक्टोंबर रोजी राजू शेट्टी यांनी मुंबई ते भोपाळ तिकीट चार दिवस आधीच काढले होते. सकाळी 5 वाजून 45 मिनीटांनी विमान उड्डाण घेणार असल्याने ते सकाळी 4 वाजताच विमानतळावर राजू शेट्टी पोहचले होते.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा आणखी एक सर्जिकल स्ट्राईक, संजय राऊतांचा जामीनदारच फोडला!
दरम्यान बोर्डिंग पास काढण्यासाठी गेले असता एअर इंडियाच्या प्रशासनाकडून सीट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. बराच काळ वाद घातल्यानंतर त्यांना त्याच विमानाचे बिझनेस क्लासचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आले. तसाच प्रकार कालही घडला असून दिल्लीहून पुण्याला येत असताना बोर्डींग बंद होण्याच्या 45 मिनीट आधी पोहचूनही व दोन दिवस आधी तिकीट काढूनही सीट उपलब्ध नसल्याचे एअर इंडियाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. वेळेत येवूनही सीट न मिळाल्याने संतापलेल्या राजू शेट्टी यांनी प्रशासनाबरोबर त्याठिकाणी चांगलाच गोंधळ घातला.
दरम्यान एअर इंडियाकडून अर्धा तास आधी याच विमानाचे प्रवाशांकडून जादा पैसे आकारणी करून तात्काळ तिकीट आदा करण्यात आले होते. व संबधित प्रवाशास सीट देण्यात आली होती. सीटच उपलब्ध नाही अशा अर्धा तासाच्या या गोंधळानंतर सात वाजता विमान सुटणार असतानाही सहा वाजून 15 मिनीटांनी त्याच विमानात त्यांना दोन सीट उपलब्ध करून देण्यात आले मग ह्या जागा कोठून आल्या हे न सुटणारे कोडे पडले आहे.
हे ही वाचा : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात AU म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंचा लोकसभेत दावा
भारतीय विमान प्राधिकरणाने प्रवाशी क्षमतेपेक्षा जादा बुकींग घेण्याच्या दिलेल्या निर्णयाने प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. याबाबत संबधित एअर लाईन्स कंपनीकडून कोणतीही पुर्वसुचना न देता चार चार दिवस आधी बुकींग करूनही व वेळेत विमानतळावर पोहचूनही सीट उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
यामुळे राजू शेट्टी यांनी भारतीय विमान प्राधिकरण व एअर इंडियाच्या या कारभाराबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचेकडे तक्रार केली आहे.