संदीप शिरगुप्पे (प्रतिनिधी) कोल्हापूर, 4 एप्रिल : कोल्हापूर म्हटलं की मिसळ, कोल्हापुरी गुळ, तालीम मंडळांचा फुटबॉल संघ आणि पायतान या गोष्टी तुमच्या समोर येतातंच… पण त्याही पेक्षा आवडीनं कट्ट्यावर बसून चर्चा होते ती कोल्हापुरच्या राजकारणाची… बंटी आणि मुन्ना यांच्या कलगीतुऱ्याची…अशा या कोल्हापूर जिल्ह्याच्या 122 गावात सध्या वारे वाहतायत कोल्हापुरच्या उत्तरेत असणाऱ्या कसबा बावड्यातल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे… आमदार बंटी पाटलांनी सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी आपल्या शैलीत “आमचं ठरलंय, आता कंडका पाडायचाच” असं म्हणत थेट महाडिक घराण्याला आव्हान दिलं आहे…परंतु या सगळ्या राजकारणात कोणाचा कंडका पडणार? हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे… दरम्यान या निवडणुकीनंतर काही राजकीय समिकरणंही बदलणार आहेत. ती नेमकी कशी? हे आपण जाणून घेऊ… आधी जाणून घेऊया, आमचं ठरलयं… गोकुळ उरलयंपासून ते कंडका पाडण्यापर्यंतचा इतिहास कोल्हापुरच्या लोकांचा अंदाज कुठल्याच देवाला घेता आला नाही… कोल्हापुरी जनता बरोबर ठरवते ‘राजकारणात कोणाला कुठल्या स्थानावर संधी द्यायची’… आता बघाकी… 2019 पर्यंत खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळ दुध संघ, बाजार समित्या या सगळ्या ठिकाणी कोल्हापुरी जनतेने महाडिकांना सत्तेत आणलं होतं. पण… त्यांचे कट्टर विरोधक आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांनी असा काही गेम खेळला अन् पहिल्यांदा दणका दिला तो महाडिक घराण्याचे किंगमेकर महादेवराव महाडिक यांना विधानपरिषदेत पाडून… यानंतर त्यांनी ‘आमचं ठरलयं’ असं म्हणत खासदारकीच्या निवडणुकीत धनंजय महाडिक, यानंतर आमदारकीला अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, मागच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळ निवडणुकीत अन् आता सतेज पाटील महाडिक घराण्याविरोधत थेट उतरलेत ते राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत… ‘आमचं ठरलयं आता कंडका पाडायचा’ हे स्लोगन त्यांनी प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत… पण राजारामची निवडणुक एवढी प्रतिष्ठेची का होतेय? मागच्या चार महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात ग्रामपंचायतींसह, सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसह आता सहकार साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत. स्थानिक राजकारण आणि आघाड्यांच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जात असल्यानं काही अंशी पक्षाचा विचार न होता तडजोडीचं राजकारण करून या निवडणुका लढवल्या जातात, पण राजाराम कारखान्याच्या बाबतीत असं होत नाहीय. मागच्या 28 वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक हे राजाराम कारखान्याची सुत्रं सांभाळतायत… राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाडिक घराण्यातील तिसऱ्या पिढीचा राजकारणात प्रवेश झाला आहे. राजारामच्या प्रचारासाठी धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक मैदानात उतरले आहेत. अशात या बलशाली घराण्याला थेट आव्हान देताना गेल्या 28 वर्षांत सभासदांच्या हिताचे काहीच निर्णय झाले नसल्याचा आरोप विरोध गटाकडून म्हणजे सतेज पाटील यांच्याकडून होतोय…
राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत आमदार पाटील गटाने अर्ज भरले. यावेळी सतेज पाटलांनी म्हणाले… “राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा ही आमची भूमिका आहे. बारा हजार सभासद हेच त्याचे खरे मालक आहेत. ही लढाई अनधिकृत ६०० सभासद विरोधात १२ हजार अधिकृत सभासदांत आहे. ती महाडिक आणि पाटील अशी नाही.” शिवाय ते असंही म्हणालेत की, महाडिक कुटुंबीयांनी राजाराम कारखान्याच्या प्रगतीसाठी काय केलं हे सांगण्यासारखं नसल्यानेच महादेवराव महाडिक प्रचारासाठी बाहेर पडत नाहीत. कारखान्यात केलेल्या भ्रष्टाचाराला सभासद कंटाळले आहेत. या कारखान्यात महाडिक यांची हुकूमशाही चालते, ती थांबवून एकदा कंडका पाडायचा आहे.’ यावर महाडिक गटाकडून प्रतित्त्युर देताना अमल महाडिक म्हणाले की, तब्बल २७ वर्ष नेतृत्व करताना आम्ही हा कारखाना सभासदांचा ठेवला, त्याचं खाजगीकरण केलं नाही. शेतकरी सभासदांना सन्मानाची वागणूक दिली. याउलट पाटील यांच्या डॉ. डी.वाय. पाटील कारखान्यातंच हुकुमशाही आहे. एका रात्रीत तिथले पाच हजार सभासद कमी का केले? सभासदांना त्यांच्या हक्काची साखर मिळते का? या प्रश्नांची उत्तरं आमदार पाटील यांनी द्यावीत. कारखान्याच्या कारभाराविषयी कुठेही चर्चा करायला आम्ही तयार आहोत. आता या इतक्या छातीठोक आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या का होतायत? तर.. राजारामची निवडणुक ही आगामी काळातील निवडणुकांची रंगीत तालीम आहे… सध्या 122 गावांपुरती कारखान्याची निवडणुक असली तरी या निवडणुकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. त्यामुळे सभासद, शेतकरी कुणाला कौल देणार आणि कुणाचा कंडका पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. - संदीप शिरगुप्पे / वैष्णवी राऊत