कोल्हापूर, 1 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले आहेत. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर ही छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागच्या सहा तासांंपासून ईडीचे अधिकारी बँकेत कागदपत्र तपासत आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या दालनामध्येच ईडीचे अधिकारी कागदपत्रांची छाननी करत आहेत. सेनापती कापशी ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक शाखा आहे, या शाखेवरही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. याआधी महिनाभरापूर्वीच ईडीने हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या निवासस्थानी छापे टाकले होते, त्यानंतर आता मुश्रीफ अध्यक्ष असलेली बँक ईडीच्या रडारवर आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर कारखान्याच्या मनी लॉण्ड्रिंगचे आरोप केले जात आहेत. कारखाना खरेदी करण्यासाठी मनी लॉण्ड्रिंगचा पैसा मुश्रीफ यांनी वापरल्याचा आरोप होत आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे.
या प्रकरणाची मागील सहा महिन्यांपासून आम्ही चौकशी करत होतो अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.