ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 7 मार्च : कोल्हापुरात बैलगाडा शर्यतीत अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. शर्यतीतील वेगाचा पाठलाग करताना बैलगाडी खाली येऊन अनेक जण जखमी झालेत. त्यामुळे शर्यतींना परवानगी देताना आता विचार करण्याची वेळ आलीय. कोल्हापुरातल्या मुरगुड मध्ये बैलगाडा शर्यतीत घडलेल्या अपघातानी अंगावर काटा आलाय. बैलगाड्या थेट गर्दीत घुसल्याने अनेकजण चिरडले गेलेत. तर बैलांच्या मागे धावणारी एक दुचाकीही बैलगाडीखाली आलीय. एकावर तर बैलगाडीत पाय अडकल्याने फरफटत जाण्याची वेळ आली. बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवायला गेलेल्या माणसांच्या बाबतीतच अशा थरारक घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात सुदैवाने कोणी दगावले गेले नसले, तरी जे जखमी झालेत त्यांना मात्र जन्माची अद्दल घडलीय.
खासदार संजय मंडलिक यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. माळरानावर आयोजित या शर्यती पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. बैलगाडा शर्यतीला यापूर्वी बंदी होती, मात्र अलीकडेच या शर्यती सुरू असल्याने बैलगाडा चालक आणि प्रेक्षक यांच्यात चांगलाच उत्साह संचारला होता. मात्र या उत्साहाच्या भरात शर्यतीला अपघाताचे ग्रहण लागले, त्यामुळे आता असे अपघात रोखण्यासाठी, परवानगी देताना खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

)







