रत्नागिरी, 13 डिसेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील नांदगाव इथं गबुडी नदीत बकरी चारण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. अब्रार अरिफ कादरी वय 9 वर्ष आणि जियाद अरिफ कादरी वय 6 वर्ष अशी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोन भावांची नावे आहेत.
दोन्ही भाऊ नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी नदीत उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत गावातील लोकांना समजताच त्यांनी एका होडीद्वारे दोन्ही भावांचा नदीत शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर संध्याकाळी दोघांचेही मृतदेह ग्रामस्थांना अथक परिश्रमानंतर हाती लागली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही घटना घडून दोन दिवस झाले खेड पोलिसांना तरीही या दुर्घटनेची कल्पना देखील नव्हती.
गावातीलच काही जणांनी सोशल मीडियावर या दोन भावांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आज रविवारी सकाळी नांदगाव या गावात शनिवारी घडलेल्या या घटनेची माहिती समोर आली. याबाबत रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याशी फोनवरून या दुर्घटनेबाबत संपर्क साधला असता आपल्याला या घटनेबाबत काहीही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.