नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 28 मार्च : शेती हा देशातील अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु, लहरी निसर्ग आणि बाजाराचे गणित यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी पिचला जातो. मात्र, असंख्य संकटे आल्यानंतरही काही शेतकरी शेतीची वाट न चुकवता त्यात प्रयोग करत राहतात आणि एक ना एक दिवस यशस्वी देखील होतात. असाच एक प्रयोग केलाय जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने काय आहे हा प्रयोग पाहुयात.
कोणी केला प्रयोग?
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात शेती असणाऱ्या राजेंद्र चोरडिया यांनी आपल्या शेतात जिरेनियम या औषधी वनस्पतीची लागवड केली आहे.
या वनस्पतीमधून निघणाऱ्या तेलापासून अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने बनवली जातात. एक एकर शेती मधून दर तीन महिन्याला 8 ते 10 लिटर तेल निघते. या तेलाला बाजारात चांगली मागणी असून 10 ते 12 हजार रुपये प्रति लिटर दराने याची विक्री होते. शेतकरी दर तीन महिन्याला या शेतीमधून 1 लाख रुपयांचे उत्पादन घेऊ शकतो. वर्षाला तीन ते चार वेळा पिकाची कापणी होते. म्हणजे वार्षिक 3 ते 4 लाखांचे उत्पन्न जिरेनियम शेतीमधून घेतले जाऊ शकते.
किती आला खर्च?
जिरेनियम या वनस्पतीची वाढ ही तीन ते चार फुटांपर्यंत होते. यापासून निघणारे तेल सौंदर्य प्रसाधने यासाठी तर राहिलेल्या चोथ्यापासून सुवासिक अगरबत्ती बनवली जाऊ शकते. राजेंद्र चोरडिया यांनी 50 दिवसांपूर्वी जिरेनियम रोपांची 5 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. यासाठी त्यांना अडीच ते तीन लाखांचा खर्च आला. तसेच ठिबक सिंचनाची सोय देखील त्यांनी रोपांना पाणी देण्यासाठी केली आहे.
पिकाचे राखण करण्याची गरज नाही
या वनस्पतीवर कोणताही रोग पडत नाही. कोणतेही जनावर याला खात नाही. तसेच नासधूस करत नाही. त्यामुळे पिकाचे राखण करण्याची गरज नाही. तसेच खते आणि औषधांचा खर्च देखील जास्त नाही. याला 19-19-19 सारखी विद्राव्य खत आणि एखादे बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते. पीक तीन महिन्याचे झाल्यानंतर जमिनीपासून चार बोटे अंतर ठेवून कापणी करता येते. रोपांची लागवड ही 4 बाय सव्वा फुटावर केली आहे. 5 एकर क्षेत्रामध्ये वार्षिक 12 ते 15 लाख उत्पन्नाची अपेक्षा आहे, असं राजेंद्र चोरडिया यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Jalna, Local18