जालना, 8 जुलै : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. जालना जिल्ह्यातील काजला गावातील सामान्य कुटुंबातील योगेश पैठणे या तरुणाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. दहाव्या वर्गात केवळ 44 टक्के गुण योगेशला होते. एमपीएससीची तयारी करताना देखील अनेक अडचणी आणि संकटांना त्याला तोंड द्यावे लागले. मात्र त्याने हार न मानता यश मिळवले आहे. त्यामुळे गावात त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. कसा झाला प्रवास? योगेश पैठणे हा सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हापरिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण देखील गावातीलच एका विद्यालयात घेतले. त्यानंतर त्याने मत्सोदरी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. आधी संभाजीनगर आणि नंतर पुणे इथे जाऊन परीक्षेची तयारी केली.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने पैशांची नेहमीच चणचण असायची. वेळप्रसंगी वडील कर्ज काढून पैसे पाठवायचे. दोन वेळा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेत अपयश आल्याने काही काळ त्याला नैराश्याने देखील ग्रासले होते. मात्र पुन्हा मनाशी खूणगाठ बाधत अभ्यासाला सुरुवात केली अन् तिसऱ्या प्रयत्नात तीनही टप्पे पार करत त्याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. स्वप्न पूर्ण झाल्याचे समधान आई आणि वडिलांनी सतत पाठिंबा दिला. आर्थिक परिस्थिती कमकुवत असून देखील वडील आणि मोठ्या बंधूने कधीही कशाचीही कमी पडू दिली नाही. त्यामुळे वाईट काळात उभारी घेण्यास बळ मिळाले. आज माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे योगेश पैठने याने सांगितले. आम्ही त्याची साथ दिली तर अनेक संकटांना तोंड देऊन देखील मुलगा सगळ्यांना पुरून उरला आणि त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केलंच. अनेक अडचणीच्या प्रसंगात आम्ही त्याची साथ दिली. त्याने केलेल्या कष्टाचं फळ त्याला मिळाल्याचे योगेशच्या वडिलांनी सांगितले.
Beed News : 3 वेळा अपयश आलं, मोलमजुरी करून केला अभ्यास अखेर शेतकऱ्याचा मुलगा झाला PSI video
जंगी मिरवणूक काढून स्वागत
अत्यंत साधारण कुटुंबातून येऊन योगेश पैठने याने हे यश मिळवले आहे. अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. त्याने मिळवलेल्या यशाने योगेश याचे कुटुंबीय तर आनंदी आहेच याच बरोबर गावकरी देखील भारावून गेले आहेत. त्यामुळेच जंगी मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले.