जालना, 6 जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलंय. जालना जिल्ह्यातल्या हिवर्डी या छोट्याश्या गावातल्या पूजा भूतेकर या शेतकरी कन्येनंही या परीक्षेत यश मिळवलंय. सामान्य कुटुंबातल्या पूजानं मिळवलेल्या या यशानं तिचं कुटुंब चांगलंच भावनिक झालंय. कसा झाला प्रवास? पूजा या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या आहेत. घरची परिस्थिती साधारण असली तरी कुटुंबीयांनी शिक्षणाला नेहमीच महत्त्व दिलं. त्यांनी पूजालाही तिचं करिअर निवडण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिलं. पूजानं प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण नवोदय विद्यालय आंबामध्ये झालं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीला क्लास लावून त्यांनी एमपीएससीचा अभ्यास केला. त्यानंतर आणखी चांगली तयारी करण्यासाठी पुणे गाठलं. पूजाच्या या कष्टाचं अखेर चीज झालंय. त्यांनी पीएसआय परीक्षेत 372 वा रँक मिळवत यश मिळवलंय. आईनं मोलमजुरी करून दिलं शिक्षण, पीएसआय बनतं सुनीलनं साकारलं स्वप्न Video ‘माझ्या या यशामध्ये माझ्या कुटुंबीयांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मी हे यश त्यांनाच समर्पित करेल.एमपीएससीची तयारी करताना तुमच्याकडे सातत्य, चिकाटी आणि संयम या गोष्टी असल्या पाहिजेत. याच गोष्टी तुम्हाला इथे टिकवून ठेवतात आणि पदापर्यंत पोहोचवतात. नवीन विद्यार्थ्यांना माझे एकाच सांगणे आहे की, मोठी स्वप्न बघा कधीही परिस्थितीचा बाऊ करू नका. सातत्याने प्रयत्न करा यश आपल्याला नक्कीच मिळते. मी याचं उत्तम उदाहरण आहे,’ असं पूजानं सांगितलं. आपल्या नातीने मिळवलेल्या यशाने पूजा भुटेकर यांच्या आजोबांचा कंठ दाटून आला होता. मुलीने मिळवलेल्या यशाने माझा ऊर भरून आलाय. मला शब्द सुद्धा फुटत नाहीत. पोरीने आमचा नाव काढलं याचा अभिमान असल्याचे पूजाचे आजोबा गुलाब भुतेकर यांनी सांगितले.