नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 30 मे : अनेक प्राचीन वास्तू देखभाल होत नसल्याने विपन्नावस्थेत असल्याचं आपण आजुबाजुला पाहत असतो. प्रशासन आणि संबधित संस्थानाच्या अनास्थेमुळे या पुरातन वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर जातात. जालना शहरात देखील अशीच एक वास्तू आहे. जालना शहराच्या जडणघडणीत पारशी समाजाचा मोठा वाटा आहे. शहरात आजही अनेक संपत्ती त्याच्या नावावर असल्याचं सांगितलं जातं. सध्या हा समाज जालना शहरात राहत नसला तरी आपल्या पाऊलखुणा मात्र मागे सोडून गेलाय. त्यापैकीच एक म्हणजे टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच पारशी समाजाची स्मशानभूमी आहे. पारशी धर्माला भारताबाहेर झोरोस्ट्रियन धर्म म्हणतात. गेल्या सुमारे तीन हजार वर्षांपासून झोरोस्ट्रियन धर्माचे लोक दोखमेनाशिनी या नावाने अंत्यसंस्कार करण्याची परंपरा पाळत आहेत. ही परंपरा चालवण्यासाठी हे लोक पूर्णपणे गिधाडांवर अवलंबून आहेत. कारण गिधाडेच मृत शरीराला आपले खाद्य बनवतात. पारशी लोक पृथ्वी, पाणी आणि अग्नी यांना अत्यंत पवित्र मानतात, त्यामुळे समाजात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याचे शरीर या तिघांच्या हाती दिले जात नाही.
अंत्यसंस्कारासाठी टॉवर ऑफ सायलेन्स पारशी समाज हा इराण वरून व्यापारासाठी भारतात आलेला समाज आहे. इंग्रजांची सत्ता भारतात असताना हा समाज मोठ्या प्रमाणावर भारतात विखुरला गेला. जालना शहरात देखील मोठ्या संख्येने हा समाज राहायचा. समाजाची संख्या मोठी असल्याने त्यांच्या प्रत्येक कार्यासाठी विशिष्ठ जागा निश्चित करण्यात आली. मृत व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी टॉवर ऑफ सायलेन्स बांधण्यात आल्याचे इतिहास अभ्यासक रवीचंद्र खर्डेकर सांगतात. कसा होतो अंत्यसंस्कार? पारशी समाज हा पृथ्वी, पाणी आणि अग्नी यांनी पवित्र मानत असल्याने मृत व्यक्तीला अग्निडाग किंवा दफनविधी करत नाही. तर मृत व्यक्ती पशू पक्षांना खाण्यासाठी टॉवर ऑफ सायलेन्समध्ये ठेवण्यात येतो. पारशी समाजतील व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर सगळ्यात आधी मृतदेह बाजूला असेलल्या खोलीत ठेवला जातो. तिथे मान्यतेनुसार विधी केले जातात. त्यानंतर कुणी नातेवाईक येणार असतील त्यांच्यासाठी थांबले जाते. सगळे आप्तेष्ट आल्यानंतर मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्समध्ये आणला जातो.
अमावस्येला का करतात पितरांचे तर्पण, धार्मिक महत्त्व, टाळा या चुका
यानंतर आणखी काही विधी करून तिथे असलेल्या रकान्यात ठेवला जातो. यानंतर सगळे लोक बाजूलाच असलेल्या विहिरीवर जाऊन हातपाय स्वच्छ करतात. यानंतर आपापल्या घरी जातात. नंतर काही दिवसांनी मृतदेह पक्षांनी किती नष्ट केलं हे पहिले जाते. जेव्हा संपूर्ण मृतदेह नष्ट होऊन फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक राहील. तेव्हा तो सांगाडा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये असलेल्या छोट्या आडात ढकलला जात जातो. अशा पद्धतीने पारशी समाजात अंत्यसंस्कार केले जातात, असं रवीचंद्र खर्डेकर यांनी सांगितले.