नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 27 फेब्रुवारी: कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस पाडवा जवळ आला तरी आणखी घरातच आहे. भाव वाढेल या अपेक्षेने घरातच साठवलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी संकट बनला आहे. कारण, बाजारात विकावा तर भाव नाही अन् घरी ठेवावा तर अंगाला खाज येत आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येला जालना जिल्ह्यातील शेतकरी लक्ष्मण हिरे यांनी लोकगीताच्या माध्यमातून वाचा फोडली. आलं धोक्याचं सरकार या गाण्यातून हिरे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अन् पाहता पाहता हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. जालना जिल्ह्यासह कापूस उत्पादक पट्ट्यात या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. बदनापूर तालुक्यातील चिखली गावचे रहिवासी असलेले लक्ष्मण हिरे यांच्याकडे 10 एकर शेती आहे. यंदा त्यांनी 8 एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. सध्या त्यांच्या घरी 75 क्विंटल कापूस आहे. लागवड सुरू असताना कापसाला सोन्याचा भाव येणार अशा बातम्या यायच्या. त्यामुळे कापसाला 12 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळेल अशी अपेक्षा ठेवून ते होते. मात्र, कापसाचे दर आजही 8 हजाराच्या घरात आहेत.
कापूस विकावा तर भाव कमी दर सुधारणा होईल या अपेक्षेने हिरे यांच्या बरोबरच अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. मात्र, आता शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालीय. कापूस विकावा तर भाव कमी मिळत आहे अन् न विकावा तर खाज आणि इतर त्वचा रोगावर दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतायत. शेतकऱ्याच्या याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवणाऱ्या हिरे यांच्या गाण्याला सर्वच स्तरातून प्रसिद्धी मिळत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली म्हणून त्यांचे कौतुक देखील होत आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ कारणांमुळे वाढणार भाव
शेतकऱ्यांची काळजी करावी माझ्याकडे 10 एकर शेती आहे. त्यापैकी 8 एकर क्षेत्रावर कापूस आहे. मे महिन्यात लागवडी आधी शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार असे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र 9 हजार 500 असलेले कापसाचे दर 8 हजारावर आले आहेत. एकीकडे भाव कमी झाले तर दुसरीकडे मुलाबाळांना कापसामुळे खाज येत आहे. शेतकऱ्याला इतरांचे पैसे देणे असते. त्याचे फोन सुरूच असतात. वरून कापसाचे वजन देखील कमी होत आहे. चोहो बाजूंनी कापूस उत्पादक शेतकरी घेरला गेला आहे. सरकार हे मायबाप असते. त्यांनीच आता शेतकऱ्यांची काळजी करावी, असं कापूस उत्पादक लक्ष्मण हिरे सांगतात.

)







