नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 7 एप्रिल : बदलत्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. धावपळीच्या जीवनात आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हायब्रीड वाणाद्वारे उत्पादित झालेलं अन् कीटकनाशके आणि खताचा प्रचंड वापर केलेलं अन्न खाल्ल्याने देखील अनेक वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहेत. नैसर्गिक विषमुक्त शेती करण्याकडे केंद्र सरकार देखील भर देत आहे. याच धर्तीवर अनेक शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे वळू लागलेत. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब फोपसे हे देखील त्यापैकीच आहेत. त्यांनी तब्बल 130 हुन अधिक देशी बियांचे संवर्धन केले आहे. नुकत्याच जालना शहरात झालेल्या कृषी प्रदर्शनात फोपसे यांनी आपला स्टॉल लावला होता. बियांची लागवड करून जपणूक फोपसे कुटुंबियांच्या मागील 3 पिढ्यांपासून देशी बियांचे संवर्धन केले जात आहे. त्यांच्या आजोबा पासून ही परंपरा चालत आली आहे. स्वतः च्याच शेतात या बियांची लागवड करून ते याची जपणूक करतात. टोमॅटो, मेथी, मिरची, भोपळा, शेवगा, कोथिंबीर, ज्वारी, गहू, तांदूळ, काकडी, दुधी भोपळा, दोडका, मेथी, पपई अशा एकूण 130 हुन अधिक बिया त्याच्याकडे उपलब्ध आहेत. देशी वाणांच्या बियांपासून हायब्रीड वाणासारखे प्रचंड उत्पादन मिळत नसले तरी ते आरोग्यासाठी मात्र उत्तम असतात.
काय फायदे? गावरान बियापासून उत्पादित झालेला भाजीपाला आणि अन्य पिकामध्ये मिनरल, जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा यासारख्या समस्या हल्ली वाढल्या आहेत. त्यावर देशी बियाणे वापरुन उत्पादित झालेले अन्न खाल्ल्यास नियंत्रण मिळवता येईल. हायब्रीड वाणाचे उत्पादन भरपूर होते. मात्र, त्यात देशी वाना इतके घटक नसतात. यामुळे उत्पादन कमी झालं तरी चालेल मात्र आपल्या शरीराला उत्तम तेच आपण पिकवले पाहिजे, असं बाबासाहेब फोपसे सांगतात. नैसर्गिक शेती करावी गच्ची टेरेसवर देखील आपण या बियांची लागवड करू शकतो. सगळ्यांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरून आपले आरोग्य उत्तम राखणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी किमान आपल्या कुटुंबाएवढी तरी नैसर्गिक शेती करावी, असं आवाहन बाबासाहेब फोपसे करतात.