जालना, 11 जुलै : कमी वेळात मोठा आशय व्यक्त करणारं माध्यम म्हणजे शॉर्ट फिल्म. शॉर्ट फिल्मची निर्मिती ही आता फक्त महानगरातील तरुणांची मक्तेदारी राहिलेली नाही. ग्रामीण भागातील तरुणही वेगवेगळे विषय या माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना यशही मिळतंय. जालना जिल्ह्यातल्या अभिजीत चव्हाण या तरुणानं बनवलेल्या शॉर्ट फिल्मची निवड ब्रिटनमध्ये होणाऱ्या ‘लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क’ या महोत्सवात झालीय. या टीमच्या कलाकारांनी हा सर्व प्रवास लोकल18 शी बोलताना सांगितला आहे. जालनाच्या अभिजीत दगडू चव्हाण या तरुणाच्या ‘दानपात्र’ या शॉर्ट फिल्मला हा सन्मान मिळालाय. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत फिल्म मेकिंग शिकून, अतिशय कठोर मेहनती च्या जोरावर, कुठलाही आर्थिक पाठींबा नसताना क्राऊड फंडिंगच्या आधारे आभिजीतनं ही फिल्म बनवलीय. यापूर्वी महाराष्ट्रासह, पंजाब, केरळ आणि हैदराबादमधील फिल्म फेस्टिव्हलमध्येही या शॉर्ट फिल्मनं बक्षीस जिंकले असून आता ब्रिटनमधील फेस्टिव्हलसाठी त्याची निवड झालीय.
काय आहे विषय? मंदिरामध्ये ठेवण्यात येणारी दानपेटी प्रत्येक शाळेत ठेवली तर त्यामधून जमा होणाऱ्या पैशातून अनेक गरीब मुलांचं शिक्षण होईल, असा संदेश या शॉर्टफिल्ममधून अभिजीत यांनी दिलाय. ‘ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती तितकी चांगली नाही. या शाळांना सढळ हतानं मदत केली तर भावी पिढीचं भलं होईल,’ असा विचार या फिल्ममधून मांडण्यात आल्याचं अभिजीत यांनी सांगितलं. 13 वर्षाच्या चिमुरडीची कमाल, डोळ्यावर पट्टी बांधून ओळखते प्रत्येक गोष्ट, Video ब्रिटनमधील फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाल्यानं आम्हाला खूप आनंद झालाय. आमच्या कामाची पावती या निमित्तानं मिळालीय. शहरातली उद्योगपती, व्यावसायिकांनी चित्रपट क्षेत्राकडं सकारात्मक दृष्टीनं पाहावं. सर्वच फिल्म मेकर्सना सिनेमा बनवण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा अभिजीत यांनी यावेळी व्यक्त केलीय.