जालना, 21 जुलै : जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबडाच्या मत्स्योदरी देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. मंदिराचे पुजारी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने अंबड शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी श्री मत्स्योदरी देवी मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात असलेली दानपेटी कटरच्या मदतीने फोडली आणि त्यातील रक्कम पळवली. ही घटना शुक्रवारी सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी गाभाऱ्यात गेल्यानंतर उघडकीस आली. दानपेटीतून 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती माहिती अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यानी दिली आहे.
जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध मत्स्योदरी देवीच्या मंदिरात चोरी, 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास pic.twitter.com/HGUX0zwmXV
— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2023
सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रित कारणांमुळे बंद घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीसह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपासावेळी मत्स्योदरी देवीच्या मंदिरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रित कारणांमुळे बंद पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गाभाऱ्यात शिरलेल्या चोरट्यांची ओळख पटण्यास अडचण येत आहे.