जालना, 22 जुलै : आपल्याकडे अवयव दान करण्याबाबत अनेक गैरसमज आहेत. अवयवदान करून इतरांना जीवनदान देणाऱ्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत आहे. मात्र जालना शहरातील 95 वर्षीय यमुनाबाई ठाकूर यांनी नेत्रदान करून समजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांचे वृद्धापकाळाने नुकतंच निधन झाले. त्यांनी मरणोपरांत नेत्रदान केले आहे. मुलांनी इच्छा केली पूर्ण निरक्षर असलेल्या यमुनाबाई यांनी निधनानंतर नेत्रदान करण्याची आपल्या मुलांपुढे व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा त्यांच्या मुलांनी पूर्ण करून कर्तव्य पूर्ण केलं आहे. त्यामुळे ही घटना तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे. त्यांच्या नेत्रदानामुळे दृष्टी गमावलेल्या गरजूच्या जीवनातील अंधार दूर होईल. तसेच नेत्रदान करून मरणानंतर देखील आपण पुन्हा हे जग पाहू शकतो, असा मोलाचा संदेश आजींनी समाजाला दिला आहे.
आईच्या इच्छेनुसार नेत्रदान निधनानंतर नेत्रदान करावे, अशी इच्छा त्यांनी जिवंत असताना आपल्या मुलाकडे व्यक्त केली होती. त्यांच्या निधनानंतर काही तासांनी त्यांच्या मुलांनी संभाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते आदेश बाफना आणि कचरूलाल कुंकूलोत यांच्याशी संपर्क केला. आईच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करायचे आहे, अशी माहिती त्यांना दिली. बाफना यांनी गणपती नेत्रालयातील डॉ. अभिजीत करवा यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्यांनी येऊन आजींच्या डोळ्यांची तपासणी केली. यानंतर, त्यांच्या टीमने यशस्वीपणे आजींचे नेत्रदान करून घेतले. नेत्रदानानंतर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दिनेश ठाकूर सागितले.
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना झटका, या ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय
आमच्या आजींचा आम्हाला अभिमान आमच्या आजी या 95 वर्षांच्या होत्या. त्या स्वतः निरक्षर असून देखील त्यांनी एव्हढा चांगला विचार केला आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले. आमच्या आजींनी हा निर्णय घेतला याचा आम्हाला अभिमान असल्याचे यमुनाबाई यांच्या नात दिशा दिनेश ठाकूर यांनी सांगितले.