नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 25 मार्च : शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. तसेच वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त असतात. हे नुकसान कमी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने अनोखी शक्कल लढवत हवेवर चालणारी आणि जोरदार आवाज होणारी AK 47 बंदूक तयार करून वेगळाच प्रयोग केला आहे. या बंदुकीच्या आवाजामुळे वन्य प्राणी भयभीत हेऊन शेतातून पळून जातात व पिकांचे संरक्षण होते.
कशी सुचली कल्पना?
जालना जिल्ह्यातील अहंकार देऊळगाव येथील अवघ्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या ज्ञानेश्वर खडके याने एक बंदूक बनवली आहे. ज्ञानेश्वर हा राष्ट्रीय हिंदी विद्यालयात शिक्षण घेत आहे. रिकामी प्लास्टिक बाटली, प्लास्टिक पाईप तसेच इतर किरकोळ साहित्य वापरून ही प्लास्टिकची बंदूक तयार केली आहे. हवेवर चालणारा एक शाळेतील प्रोजेक्ट पाहून ही बंदूक बनवण्याची कल्पना सुचली. भविष्यात अभियंता झाल्यावर यात अजून चांगल्या सुधारणा करून ही बंदूक आधुनिक करणार असल्याचे ज्ञानेश्वरने सांगितले.
किती आला खर्च?
यासाठी 300 ते 400 रुपयांचा खर्च आला आहे. बंदुकीतून होणाऱ्या आवजमुळे हरीण, नीलगाय, रोही, रानडुक्कर, तसेच पक्षी यांना हुसकावून लावता येते. प्राण्यांमुळे होणारे पिकांचे मोठे नुकसान टाळता येते. या बंदुकीच्या आवाजामुळे प्राणी पळून जातात व पिकांचे संरक्षण होते, असंही ज्ञानेश्वरने सांगितले.
या गोष्टीचा आनंद
नातवाला लागलेल्या बंदुकीच्या नादामुळे सुरूवातीला आजी चांगलीच चिडली पण बंदूक पाहिल्यावर चिडचिडीचे रूपांतर आता आनंदात झाले आहे. मित्र परिवारातून चांगलीच चर्चा असून, या गोष्टीचा आनंद असल्याचे त्याच्या आजी चंद्रकला खडके यांनी सांगितले. तर मुलाने केलेल्या प्रयोगाने त्याचे वडील भगवान खडके हे देखील आनंदी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.