नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 14 मार्च : जालना जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र मोठे आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने भूजल पातळीत पाणी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळी कापूस घेण्याकडे कल आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये शेतकरी कपाशी उपटून टाकतात. मात्र, पाण्याची उपलब्धता आणि कापसाला सुरुवातीला मिळालेला चांगला भाव यामुळे जिल्ह्यात आजही अनेक शेतकरी फरदड कापूस घेताना दिसत आहेत. मात्र, कृषी विभागाने फरदड कापूस न घेण्याचे आवाहन केले आहे.
का केले आवाहन?
जालना जिल्ह्यात कापसाचे पेरणी क्षेत्र 2 लाख 93 हजार हेक्टर एवढे आहे. यातील बहुतांश क्षेत्रावर उन्हाळी कापूस पाहायला मिळत आहे. जास्त पैसे मिळतील किंवा भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेतला आहे. मात्र, आता शेतकऱ्यांनी जास्त अपेक्षा न ठेवता शेत रिकामे करावे. कारण हा कापूस आता ठेवला तर पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येवू शकतो. त्यामुळे फरदड कापसाचे उत्पादन घेवू नये, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकरी भीमराव रणदिवे यांनी केले आहे.
शेतात नांगरणी करावी
आता उन्हाळा केवळ दोन महिनेच शिल्लक आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी शेतातील कपाशी पीक नष्ट करून शेतात नांगरणी करावी. जेणेकरून उन्हामुळे शेतातील कीड नष्ट होईल तसेच नांगरणी केल्यास पक्षी देखील वर आलेले कीटक खाऊन टाकतील. उन्हाळयात तापणाऱ्या उन्हामुळे अनेक कीड नष्ट होतील, असंही भीमराव रणदिवे यांनी सांगितले आहे.
बोंड अळीचा धोका निर्माण होत नाही
तर दुसरीकडे शेतकरी फरदड कापूस घेण्यामागील त्यांचा तर्क सांगत आहेत. कापूस काढून दुसरे पीक घेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. तसेच पिकाची फेरपालट केल्यास बोंड अळीचा धोका निर्माण होत नाही, असं कचरे वाडी येथील शेतकरी जगदीश जाधव यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Jalna, Local18