विवाहितेने 2 लेकरांसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

विवाहितेने 2 लेकरांसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

विवाहितेने 7 वर्षीय मुलगी प्रणिता आणि एक वर्षाच्या शंभू या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

  • Share this:

जालना, 11 जून : एका विवाहितेने आपल्या पोटच्या दोन लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना आज जाफराबाद तालुक्यातील देडेगव्हान गावात उघडकीस आली. रुख्मिणीबाई बनकर (27) असं या विवाहितेचं नाव असून तिने आपल्या 7 वर्षीय मुलगी प्रणिता आणि एक वर्षाच्या शंभू या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सदर विवाहिता रात्री उशिरा आपल्या दोन्ही लेकरांसह घरातून निघून गेली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. अखेर सकाळी गावातील एका विहिरीत तिघांचे प्रेत आढळून आले.

दरम्यान, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलेनं आपल्या मुलांसह आत्महत्या का केली, यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पुणे जिल्ह्यातही घडली होती अशीच घटना

पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे मायलेकीने भीमा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सपना कसबे (रा.सणसवाडी) असं मृत महिलेचं नाव होतं. महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला ओढणीच्या सहाय्याने कंबरेला बांधून पुणे-नगर महामार्गावरील भीमा नदीवरील पुलावरून पाण्यात उडी मारली. यात या महिलेचा व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 11, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या