Home /News /maharashtra /

जळगाव : तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांनी खोडून काढले सर्व आरोप

जळगाव : तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांनी खोडून काढले सर्व आरोप

गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

जळगाव, 18 डिसेंबर : नूतन मराठातील वादाशी काडीचा संबंध नसताना आपल्यावर अतिशय संशयास्पद पद्धतीने निंभोरा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा गंभीर प्रकार असून या मागे कुणी तरी ‘कलाकार’ असल्याचा आरोप भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. आज जी.एम. फाऊंडेशनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. 'तीन वर्षापूर्वीची घटना निंभोरा येथे गुन्ह्याच्या स्वरूपात दाखल होणे आश्‍चर्यकारक आहे. गेल्या वर्षी आपण मंत्री असताना अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे आपल्याला भेटले होते. अगदी आम्ही तीन-चार वेळेस एकत्र जेवण देखील केले आहे. यामुळे इतक्या स्वरूपाचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला ही बाब सर्व संशयास्पद आहे. यामुळे हायकोर्टात अपील दाखल केले असून यात कोर्टाने तपास करून मगच गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत. 7 जानेवारीपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला आहे,' अशी माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी दिली. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. यात अगदी मोबाईलच्या लोकेशनसह सर्व सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजवर जळगाव जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नाहीत. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण कधीही केले नाही. मात्र आता तीन वर्षानंतर गुन्हे दाखल करण्याची पद्धत चुकीची आहे. नूतन मराठा या संस्थेशी आमचे काहीही देणेघेणे नाही. मात्र यात आम्हाला अडकवण्यात आले असून यात पडद्यामागे कुणी तरी कलाकार असल्याचा संशय गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे मध्यंतरी जेलमध्ये होते. त्यांच्यावर कलम-307 सारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधून घेतले. या प्रकरणी आपण पूर्ण खोलवर जाणार असून यातील सूत्रधाराला शोधून काढणार असल्याचा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला. जिल्ह्यात सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सत्ता येते आणि जाते. आज आपली सत्ता असली तरी उद्या स्थिती बदलू शकते असा सूचक इशारा देखील विरोधकांना दिला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Girish mahajan, Jalgaon

पुढील बातम्या