Home /News /maharashtra /

पत्नीसाठी मत मागताना पतीने 18 वर्षीय तरुणीकडे केली भलतीच मागणी, खावी लागली जेलची हवा

पत्नीसाठी मत मागताना पतीने 18 वर्षीय तरुणीकडे केली भलतीच मागणी, खावी लागली जेलची हवा

फोनवरून पत्नीसाठी निवडणुकीचा प्रचार करण्याऐवजी या बहाद्दराने एका तरुणीला थेट प्रेमाचीच गळ घातली.

इंदापूर, 20 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान इंदापूर तालुक्यात एक विचित्र घटना घडली आहे. निवडणुकीत पत्नीचा प्रचार करताना एका तरुणाने गावातील एका मुलीचा फोन नंबर घेतला आणि तिला चक्क 'आय लव्ह यू' यासारखे मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिन अरुण खडके असं आरोपीचं नाव असून याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अरुण खडके याची पत्नी भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभी होती. यावेळी प्रचार करणे आणि मतदारांना माहिती मिळावी या उद्देशाने एका तरुणीचा फोन नंबर खडके याने घेतला होता. मात्र फोनवरून पत्नीसाठी निवडणुकीचा प्रचार करण्याऐवजी या बहाद्दराने एका तरुणीला थेट प्रेमाचीच गळ घातली. सदर आरोपीने तरुणीला 'आय लव्ह यू', 'आय मिस यू' यासारखे मनात लज्जा उत्पन्न करतील असे मेसेज केले आणि तिला आपल्यासोबत बारामती आणि पुणे येथे येण्याची मागणी केली. खडके याचा वाईट हेतू लक्षात येताच या तरुणीने त्याचा कॉल रेकॉर्ड करीत याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. निवडणूक काळात दिलेल्या 4 हजार रुपयांच्या बदल्यात वेगळीच केली जाणारी मागणी तरुणीच्या लक्षात आल्याने ही बाब उघड झाली. या फोन रेकॉर्डिगनुसार ही तरुणी सदर आरोपीला तू गावचा विकास करण्यासाठी उभा आहेस असं म्हणताच मला तुझा विकास करावयाचा आहे असं उत्तर खडके यांने दिल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक काळात या तरुणाने केलेल्या कृत्याची चर्चा आता चौका-चौकात रंगू लागली आहे. सचिन खडके याने ज्या 18 वर्षीय तरुणीला मेसेज केली ती सैनिक भरतीसाठी पुणे येथे गेली होती. यावेळी खडके याने तिला मी पुण्याला येत आहे हे सांगितल्यामुळे घाबरून ही तरुणी परत आली. तिला आरोपीने वाईट उद्देश मनात ठेवून माझ्यासोबत बारामतीला चल अशी मागणी केली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार मीनल शिवरकर करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Gram panchayat, Pune (City/Town/Village), Pune news

पुढील बातम्या