मुंबई, 19 जुलै : कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगडमधल्या नद्या तर धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. 24 तासांपासून कोसळत असणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनही विस्कळीत झाली आहे. दिवसभर पावसाचा जोर कायम असताना भारतीय हवामान खात्याने उद्याही असाच पाऊस राहील, असा इशारा दिला आहे. 20 जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या या इशाऱ्यामुळे उद्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासनाने तिथल्या परिस्थितीनुसार शाळांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. ‘सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत, कर्नाटक तेलंगणा तसंच इतर शेजारच्या राज्यांशी समन्वय साधण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, जेणेकरून धरणाचं पाणी सोडल्यानंतर कोणत्याही भागात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशाप्रकारचा समन्वय करायला सांगितला आहे, तसंच गरजेनुसार निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. ‘सर्व यंत्रणांना तयार ठेवलं आहे, सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर वाढला आहे. जिथे आवश्यक वाटेल तिथे स्थलांतर आणि मदत पोहोचवण्यासाठी सांगितलं आहे. आमची सगळी यंत्रणा फिल्डवर काम करत आहे. एनडीआरएफच्या तुकड्याही गरज लागेल तिथे तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही काळजी घ्यावी, घराबाहेर कामाशिवाय पडू नये. सुरक्षित जागी राहावं,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. लोकल बंद आहेत तिथे बेस्ट बसेस सोडण्यात याव्या, अशा सूचना आयुक्तांना दिल्या आहेत, त्यामुळे लोकांचा त्रास कमी होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.