मुंबई 24 जून : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विरोध पक्षनेत्याच्या आसनाजवळ जाऊन बसवलं आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंत सर्व नेत्यांनी वडेट्टीवारांना शुभेच्छा देणारी भाषणं केलीत. शेवटी वडेट्टीवारांनीही सर्वांचे आभार मानले. या सर्वांच्या भाषणात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा सर्वांनी आवर्जुन उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करण्यासाठी त्याचा वापर केला. वडेट्टीवारांनी तर विरोधी पक्षनेतेपदावर काम करताना तुमची मदत लागेल अशी गळच त्यांना घातली आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला दाद दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले,आदिवासी भागातून मी माझ्या कारकीर्दीची सुरुवात केली. मी उपेक्षित, दुर्लक्षित माणसाला पुढे आणण्यासाठी अविरत काम केलं. मी शिवसेनेत काम केलं नसतं तर मी आज या ठिकाणी आलो नसतो. मी सत्ताधाऱ्यांकडे जनतेच्या हिताची कामं घेऊन गेलो, वैयक्तिक काम कधीही नेली नाहीत. विरोधी पक्षनेते असताना खडसेंचं भाषण आम्ही बाहेर असेल तर धावत जाऊन ऐकायचो, नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाची मला अत्यंत आवश्यकता आहे. थेट मार्गदर्शन करता येत नसेल तर त्यांनी अदृश्य रुपात मार्गदर्शन करावं अशी कोपरखळीही त्यांनी मारली त्याला विरोधीपक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही हासून दाद दिली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना सरकारची पळता भुई थोडी व्हायची, टी ट्वेंटीची मॅच खेळताना एकटं खेळून चालत नाही चांगली टीम लागते असं त्यांना अजित वारांना सांगितलं. ज्याला महत्त्वाकांक्षा नाहीये तो राजकारणात राहू शकत नाही. सीएम साहेब तुम्हाला दिल्लीत पाहायचंय असंही वडेट्टीवारांनी सांगितलं.
अशी झाली निवड
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. काँग्रेसचा विदर्भातील आक्रमक चेहरा अशी वडेट्टीवार यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या आक्रमकतेचा काँग्रेसला भविष्यात फायदा होऊ शकतो.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. काँग्रेसकडून सुरुवातील या पदासाठी अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती. यामध्ये बाळासाहेब थोरात यांच्याही नावाचा समावेश होता. आता मात्र काँग्रेसनं वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse, Vijay wadettiwar