मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या मान्सूनचा पाऊस (Monsoon Rains) जोरदार कोसळत असून अनेक भागात पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग (Heavy rains) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोसळणारा पाऊस पुढचे चार ते पाच दिवस (4 to 5 days) असाच कोसळत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Severe weather warnings issued by IMD for Maharashtra for 22-26 Jul.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2021
Next 2,3 days Konkan Madhya Mah alerts issued. Pl see IMD updates regularly. pic.twitter.com/gPREiKcXjQ
महाराष्ट्रात पावसासाठी अनुकुल वातावरण असून पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी 22 ते 26 जुलै हे पाच दिवस जोरदार पावसाचे असतील, असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मुंबईलादेखील पावसानं झोडपून काढलं आहे. चिपळूणपणे पूर्ण शहर पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे. तर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येदेखील मान्सून जोरदार बरसतो आहे. अशा परिस्थितीत पुढील पाच दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात मान्सून बरसरणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. किनारपट्टी भागाला रेड अलर्ट समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या भागात पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सांगली, कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वाचा - LIVE: रत्नागिरी-खेडच्या शिरगावातला पूल गेला वाहून, 12 वाड्यांचा संपर्क तुटला पुढचे पाच दिवस काळजीचे राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत, तर जनजीवनही ठप्प होत असल्याचं चित्र आहे. खंडाळा घाटात दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर राज्यात झाडे कोसळून, दरड कोसळून अनेक अपघात घडत असल्याचं चित्र दिसत आहे. नागरिकांनी गरज नसेल, तर घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावं, असा सल्ला प्रशासनानं दिला आहे.