हर्षल महाजन,नागपूर 28 जून : मुंबईसह परिसरात सध्या जोरदार पाऊस पडतोय, विदर्भातही काही भागात तुरळk पावसाचा अंदाज असून, तीन दिवसानंतर विदर्भात मुसळाधार पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. सध्या विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती दमदार पावसाची मात्र त्यासाठी तीन दिवस वाट पाहावी लागेल असं मत नागपूरच्या हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केलं.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरू झाला. मात्र विदर्भ अजुनही कोरडाच आहे. पाऊस येईल या आशोने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र जून महिना संपत आला असला तरी पावसाची काही चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत दमदार पाऊस झालाय.
दीड तास पाऊस झाला आणि दुष्काळच दूर झाला
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या कवठे येमाई परीसरात गुरुवारी सायंकाळी दीड तास तुफानी पाउस झाला.गेल्या 50 वर्षात असा पाउस झाला नाही अस शेतकरी सांगतायेत. यामुळे शेतकरी सुखावले असून ओढे नाले तुडुंब भरून वाहिले तर घोडेवस्ती दत्त ओढ्यावरील पुलावरुन पाणी गेल्याने मलठण - कवठे वाहतुक दिड तास बंद होती. परिसरातील नागरिकांनी या ओढ्यावर आलेल्या पुलाचं पाणि पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वादळाने विद्युत खांब पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला. दिड तासात पाण्याचा दुष्काळ हटला. खरीपातील शेती मशागतीस यामुळे सुरुवात होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातही ढग फुटी?
पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील पेठ,पिंपळगाव(खडकी)येथे गुरुवारी सायंकाळी ढग फुटी सारखा पाऊस पडला आहे.यामुळे ओढ्याना मोठा पूर आला.जमिनीचे बाध फुटले जाऊन नुकसान झालेl. पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असून शेतातील बांध वाहिल्याने व पिके वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यावरून वेगात वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. ढगफुटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रशासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी केली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्या पासून बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात होता मात्र पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र टंचाई झाली होती मात्र आज गुरुवारी झालेल्या पावसाने एका महिन्याची भरपाई भरून काढली असून ओढे, नाले,बंधारे तुडुंब भरले आहेत,तर काही परिसरात या पावसाने मोठे नुकसान केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vidharbha rain