भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी ट्वीट करून सरदार तारा सिंह यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : महाराष्ट्रचे दिग्गज नेते आणि भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. आज सकाळी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी ट्वीट करून सरदार तारा सिंह यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी ट्वीट करत, 'माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी लिलावती रुग्णालयात निधन झाले.

ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो' असं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारा सिंह यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक होती. इतकंच नाही तर त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यावेळी किरट सौमय्या यांनी ट्वीट करत निधनाची अफवा असल्याचं म्हटलं होतं. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंग यांच्या निधनाने जनसामान्यांचा नेता, एक सच्चा समाजसेवक हरपला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच कार्यसम्राट ही उपाधी जनतेने त्यांना बहाल केली होती, त्यांचे निधन संपूर्ण भाजपा परिवारासाठी धक्कादायक आहे, अशा शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

2019 ची निवडणूक केवळ वयामुळे ते लढले नाही, अन्यथा तितक्याच मताधिक्याने ते निवडून आले असते. पण रुग्णालयात दाखल होईस्तोवर, अखेरच्या क्षणापर्यंत ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहिले. मुंबई महापालिका असो वा विधानसभा त्यांची संपूर्ण कारकीर्द ही अतिशय प्रामाणिक जनसेवक म्हणून राहिली. तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब नांदेड गुरूद्वाराचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. चुकीच्या प्रथांविरुद्ध संघर्ष केला. तेथील सुवर्णकलशाचे काम पूर्ण प्रामाणिकतेने पूर्ण केले. कायम जनतेत राहणारा, एक लाडका नेता आज जनतेने गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 19, 2020, 10:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या