चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी
रत्नागिरी, 1 फेब्रुवारी : केंद्र सरकारने 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात हरित विकासाला प्रथम प्राधान्य म्हणून घोषित केले आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. असे असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मात्र मोदी सरकारच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम होत असल्याचे समोर आले आहे. बेकायदेशीररित्या जंगलतोड केलेली लाकडे दोन ट्रकमध्ये भरून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या दोन ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करून दोन ट्रकसह 19 लाख 30 हजार 102 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही जागरूक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने जंगली लाकडे घेऊन जाणारे दोन ट्रक थांबवून तपासणी केली असता दोन ट्रकमध्ये जंगली लाकडे भरलेली आढळली. संबंधित ट्रक चालकाला याबाबत वाहतुक परवाना विचारला असता मिळाला नाही. लाकूड वाहतुकीला वन विभागाचा कोणताही परवाना त्या चालकाकडे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी रात्री जंगली लाकडे भरलेले दोन्ही ट्रक वन विभागाने ताब्यात घेतले.
वाचा - मृतदेह फेकायला आलेलाही त्याच्यासोबत पडला दरीत; आंबोलीतील प्रकरणाला वेगळं वळण
ट्रकचा मालक सत्ताधारी शिंदे गटाचा
बुधवारी दुपारी पंचनामा करून ट्रक चालक अशोक किसन कुसाळकर (रा. सुकीवली) आणि संकेत बळीराम चव्हाण (रा. भरणे) या दोघांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 ( 2ब ) अन्वये गुन्हा दाखल केला तर वन विभागाने विनापरवाना जंगली लाकडाची वाहतूक करणारे ट्रक (क्रमांक एमएच 12.एसएफ. 9393) व त्यामधील लाकडे साधारण 12 लाख 14 हजार 880 व ट्रक (क्रमांक एमएच 08 एपी. 7716) व त्यामधील लाकडे 7 लाख 15 हजार 227 अशा प्रकारे दोन्ही ट्रक मिळून 19 लाख 30 हजार 102 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या ट्रकमध्ये असलेली जंगली लाकडे कुठून तोडून आणली त्या जागा मालकासह लाकूड व्यवसाय करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या विषयी अधिक तपास वन विभागातील अधिकारी करीत आहेत. या ट्रकचा मालक सत्ताधारी शिंदे गटाचा राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधी असल्याचे समजत आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक ठिकाणी बेकायदेशीर जंगलतोड सुरू असून डोंगर उजाड होत चाललेले पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.