मुंबई, 8 नोव्हेंबर : फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडून ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना मिळत नसल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून येत होती. तसंच ऑर्डर रद्द केलेल्या वस्तू गोडाऊनमध्येही सापडत नव्हत्या. यानंतर कंपनीने शोध घेतला असता त्यांनाही धक्का बसला, कारण या वस्तूंवर डिलिव्हरी बॉयच डल्ला मारत होते. ऑर्डर केलेल्या या वस्तू चोरणाऱ्या तीन डिलिव्हरी बॉयना एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. प्रणय ढवळ, सागर राजगोरे, भूषण गांगण अशी त्या अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाइन साहित्य डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचे बोरिवली येथे कार्यालय आहे. भिवंडी येथील गोदामातून येणारे साहित्य वेगळे करून त्यानंतर ते ग्राहकापर्यंत पोहचवले जाते. त्यानंतर डिलिव्हरी बॉय हे त्याच्या एरियानुसार ते पार्सल घेऊन जातात. मात्र ऑक्टोबर महिन्यात दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन मोबाईल बुकिंग करण्यात आलं, यातील काही बुकिंग रद्द झाल्या. महिनाअखेरीस ताळेबंद करताना मोबाईल बुकिंग रद्द झालेल्या आणि ग्राहकांना न पोहोचलेल्या मोबाईलचा ताळेबंद बसेना. हे ध्यानात आल्यानंतर कंपनीकडून बोरिवली एम एच बी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करताना डिलिव्हरी बॉयनीच या वस्तू गायब केल्याचं समोर आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.