मुंबई, 17 नोव्हेंबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. मात्र यावेळी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक इथं असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस हे स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून निघून गेले. भाजप आणि शिवसेना युतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर येणार का, याबाबत चर्चा होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही भाजप नेत्यांनी शिवाजी पार्कवर जात बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मात्र यावेळी तिथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आवाज कुणाचा…शिवसेनेचा’, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दुमदुमून सोडला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहन्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळास भाजपचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या करत त्यांना अभिवादन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे राजकीय विरोधक राहिले असले तरी त्यांच्या मैत्रीचे किस्सेही सर्वश्रुत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शरद पवार यांनी खास शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली आहे. ‘प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला आणि समाजकारणाला अग्रक्रम देणाऱ्या राजकारणाची सिद्धता केली. अमोघ वक्तृत्व आणि मुद्द्याला थेट भिडणारा रोखठोक स्वभाव यामुळेच बाळासाहेबांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्यात सत्तेचा तिढा आणि नवं राजकीय समीकरण राजकारणाच्या पटलावर असताना बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनाचं औचित्य साधत देवेंद्र फडवणीस यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. भाजपा-सेना राजकीय संबंधांत तणाव वाढला असतानाच फडवणीस यांचे हे ट्वीट महत्त्वाचं मानलं जात आहे.
गडकरींच्या ‘गुगली’वर शरद पवारांचा ‘षटकार’, एकदा पाहाच हा VIDEO