मुंबई, 7 एप्रिल: कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेनंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात महाराष्ट्रात वीज बिलांवरून (Electricity Bill) मोठा गोंधळ झाला. अवास्तव बील आल्याचं सांगत राज्यभरातून उर्जा विभागावर नाराजी व्यक्त करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सरकारने पुन्हा कठोर निर्बंध केले आहेत. या काळातही पुन्हा वीज बिलांवरून गोंधळ होऊ नये म्हणून उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि या बैठकीनंतर वीज ग्राहकांना खास आवाहन केलं आहे. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले. ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीपण जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अचूक वीज बिल येण्यासाठी ग्राहकांनी काय करावं? कोरोना काळात रीडिंग न घेता बिले पाठविल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रीडिंग घेऊन वीज बिले पाठविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठविले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असं मत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलं आहे. हेही वाचा - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर शिवसेनेचं आक्रमक रूप, भाजपवर केले गंभीर आरोप उर्जामंत्र्यांनी केलेल्या या आवाहनाप्रमाणे ग्राहकांनी आपलं रीडिंग पाठवलं तर वीज बिलाबाबत उडणारा गोंधळ टाळणं शक्य होणार आहे. दरम्यान, राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्सचेंजमधून दररोज साधारणतः 1100 ते 1800 मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्सचेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश उर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ग्राहकांची सेवा हेच महावितरणचे ब्रीद असून ग्राहक महावितरणचे दैवत आहे. कोरोना काळात महावितरणचे कर्मचारी हे ग्राहकांना अव्याहत सेवा देत आहेत. थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही. महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







