संदीप राजगोळकर, कोल्हापूर 25 मे : वाघ बनून प्रत्येक गोष्टीत आरेला कारे करणाऱ्या शिवसेनेचा आवाज आज मात्र पुरता बंद झाला आहे. कारण बेळगावमधील मराठी भाषकांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दिवाकर रावतेंनी हातात बेळगाव पोलिसांची नोटीस पडताच, आल्या पावली माघे फिरले आहेत. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर सेनेने भरलेला आंदोलनाचा बार अखेर फुसका ठरला. मुख्यमंत्र्यांच्या बेळगावबाबतच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बेळगावबाबतची आपली भूमिका किती धरसोडीची आहे, हेही जरा तपासून पहायला हवं होतं. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात बेळगावातील मराठी जनतेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यास शिवसेना नेते दिवाकर रावते यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. दिवाकर रावते या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, कागलमधील कोगनोळी फाट्याजवळ कर्नाटक पोलिसांकडून रावते यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आला. यावेळी पोलिसांकडून दिवाकर रावते आणि संजय पवार यांना कन्नड भाषेतील जिल्हाबंदीच्या नोटीस देण्यात आल्या. आता पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावं लागलं. सध्या दिवाकर रावते कोल्हापूरच्या शिवाजी चौकात दाखल झाले आहेत. याठिकाणी कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. दरम्यान, आज दुपारी १२ वाजता बेळगावातील संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह बेळगावातील मराठी जनता सहभागी होणार आहे. सध्या संभाजी चौकात बेळगावातील मराठीजनांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकिकडे बेळगावची जनता कानडी दडपशाहीला झुगारून देण्यासाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्राकडे डोळे लावून बसली आहे. दुसरीकडे शिवसेनेसारखा जहाल पक्ष मात्र नोटीशीचा कागद हातात पडताच माघारी फिरल्याने. या आंदोलनामागील त्यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित झालीय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सवाल विचारण्याचा सेनेला खरंच नैतिक अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.