मनमाड, 11 मार्च : विनापरवाना खासगी सावकारीवर बंदी असताना देखील अनेक ठिकाणी आजही सावकारी सुरू आहे. शिवाय हे सावकार कर्जदारांना इतका त्रास देतात की त्याला कंटाळून काही कर्जदारांनी आपले जीवन संपविलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना मनमाडला समोर आली असून धुळ्याच्या कापड व्यापाऱ्याने मनमाड इथं एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Manmad Suicide Case) केली. मिलिंद पाटील असं आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी (Suicide Note) लिहून ठेवली होती. त्यात आपण खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद मालोजीराव पाटील(वय 51रा.देवपूर,सिनियर कॉलेज जवळ,धुळे) यांचा धुळे (Dhule) येथे कापड व्यवसाय असून जैन चौकात रेणुका कलेक्शन नावाने कापड दुकान आहे. हेही वाचा - गजबजलेल्या भागात युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, शहरात खळबळ पाटील यांनी काही खासगी सावकारांकडून सुमारे 8 ते 9 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातून काही रक्कम त्यांनी भरलीही होती. मात्र सावकार उर्वरित रकमेसाठी वारंवार त्रास देत होते. त्यांचा त्रास असह्य झाल्यानंतर पाटील हे मनमाडल येऊन येथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्यांनी मी काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्यापैकी बरीच रक्कम परत देखील केली आहे. तरी देखील सावकार खूप त्रास देत असून हा त्रास असह्य झाला असल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद करून चिठ्ठीत 5 सावकारांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी चिठ्ठीत ज्यांची नावे आढळली, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हास गीते हे करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.