मुंबई, 8 सप्टेंबर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Car Accident) यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दुपारी पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचं निधन झाले. दक्षिण गुजरातच्या उदवाडाहून ते परत येत होते. उदवाडा हे पारशी धर्मियांचं सगळ्यात पवित्र स्थळ आहे. सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात नेमका कसा झाला, याबाबत आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ब्रिजच्या डिझाईनमध्ये काही चुका आहेत, त्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा फॉरेन्सिक टीमने केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या अपघाताची तपासणी करण्यासाठी 7 सदस्यीय टीम घटनास्थळी पोहोचली होती. ब्रिजच्या चुकीच्या डिझाईनमुळे अपघात झाला आहे. पूलच्या रेलिंगची भिंत रोडच्या लेनकडे झुकली होती, असा दावा टीमने केला आहे. सिट बेल्ट न लावल्यामुळे सायरस मिस्त्रींना जीव गमवावा लागला. कारमध्ये मागे बसलेल्या मिस्त्रींनी सिट बेल्ट लावला असता तर एयर बॅग उघडली असती आणि एयर बॅगमुळे त्यांचा जीव वाचला असता, असंही फॉरेन्सिक टीमच्या प्राथमिक अहवालात समोर आलं आहे. एयर बॅग का उघडली नाही? सायरस मिस्त्री आणि पंडोले मर्सिडिज बेन्झ जीएलसी 220 मध्ये बसून प्रवास करत होते. या गाडीमध्ये असलेले सगळे फिचर्स काम करत होते. या गाडीमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांसाठीही साइड कर्टेन एयरबॅग्स असतात. गाडीच्या एयरबॅग्स उघडल्या पण याला थोडा उशीर झाला. गाडी खूपच स्पीडने जात होती, असं फॉरेन्सिक टीमचं म्हणणं आहे. गाडीच्या डेटा तपासणीचा अहवाल सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा तपास करताना मर्सिडिज कंपनीने गाडीचा डेटा तपासण्यासाठी नेला होता, त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडिज गाडीचा वेग हा 100 किमी प्रती तास होता. ज्यावेळी मर्सिडिज डिव्हायडरला धडकली तेव्हा गाडीचा वेग 89 किमी प्रती तास एवढा झाला. अपघातावेळी गाडीचा वेग फक्त 11 किमी प्रती तास एवढा कमी झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.