लॉकडाऊन नाही आता 2 दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा नागपुरात निर्णय
लॉकडाऊन नाही आता 2 दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा नागपुरात निर्णय
कोरोना थैमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली.
शहरात उद्यापासून 2 दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
नागपूर, 24 जुलै : महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच उपराजधानी नागपुरातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात उद्यापासून 2 दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
मनपा मुख्यालयात आज अधिकारी आणि नागपूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी यांच्यासह इतर काहीजण उपस्थित होते. बैठकीत सर्वांच्या संमतीने हा जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. आज शहरात दिवसभर जनता कर्फ्यू संदर्भात सर्वत्र जनजागृती केली जाणार आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता 25 जुलै आणि 26 जुलै या दोन दिवासांमध्ये इतर सर्व व्यवहार बंद असणार आहे. जनता कर्फ्यूत विनाकारण बाहेर निघणाऱ्या नागरिकांना पोलीस विनंती करुन घरी परत पाठविणार आहेत. जनता कर्फ्यू नंतर 27 जुलै ते 31 जुलै पर्यंत मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेत जाऊन लोकांना शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करुन पुन्हा जनजागृती करणार आहे.
31 जुलैला पुन्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक होणार असून लॉकडाऊन करावे की नाही याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.
दरम्यान, नागपुरात काल आणखी 172 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात आतापर्यंत कोरोनामुळे 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी आणि दुकानदारांनी नियम पाळले तर ठीक नाहीतर कडक लॉकडाऊन करावे लागणार, असा इशारा आजच्या बैठकीनंतर देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.