मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठवाड्यात 'कोरोना'ची एण्ट्री? जालन्यामध्ये पोलिसालाच लक्षणे आढळल्याने खळबळ

मराठवाड्यात 'कोरोना'ची एण्ट्री? जालन्यामध्ये पोलिसालाच लक्षणे आढळल्याने खळबळ

प्रातिनिधक फोटो

प्रातिनिधक फोटो

जालन्यात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ माजली असल्याचं पाहायला मिळत आहे.

जालना, 12 मार्च : राज्यासह सर्वत्र धुमाकूळ घालत असलेला कोरोना आता थेट जालन्यापर्यंत पोचला आहे. दोन दिवसांपासून 'कोरोना आला रे आला'च्या अफवेने जालनेकरांची झोप उडाली होती. मात्र, आज जालन्यात खरोखरच कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ माजली असल्याचं पाहायला मिळत आहे.

संशयित रुग्ण हा जालना जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहे. मुंबई येथे कर्तव्य बजावत असताना इस्रायली कमांडोच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर रुग्णाने यापूर्वी मुंबई येथील पोलीस रुग्णालयात 4-5 दिवस उपचार घेतल्याची प्राथमिक माहिती असून गेल्या 2 दिवसापासून परत सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने आज तो स्वतःहून जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला.

डॉक्टरांनी त्याला 'कोरोना'साठीच्या विशेष अशा आयसोलेशन वॉर्डात हलविले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. सदर रुग्णाच्या स्वॅब टेस्टिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून या रिपोर्टवरूनच तो कोरोना पॉझिटीव्ह आहे की निगेटिव्ह हे स्पष्ट होईल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड आणि महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.एस. पाटील हे रुग्णाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान, तालुक्यातील खरपुडी येथील एका इसमाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा मेसेज कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. मात्र, सदर मेसेज बनावट आणि निराधार असल्याचंही प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

बीडमध्येही कोरोना संशयितांवर उपचार सुरू

पुण्यातील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बीडमधील तिघांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आलं आहे. त्यांची तपासणी करून नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आयसोलेशन वॉर्डमध्ये देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

First published:

Tags: Coronavirus, Marathwada