नागपूर, 01 ऑगस्ट : देशात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. रिकव्हरी रेट चांगला असला तरीही संक्रमणाचा वेग कमी होण्याचं नाव घेत नाहीय. यातच एक धक्कादायक बाब नागपुरात घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या जखमी तरुणानं रेनकोट समजून पीपीई सूट चोरी केला. या तरुणाची कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण भाजी विकून आपला रोजगार मिळवत होता. गेल्या आठवड्यात दारू पिऊन घरी आला होता. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. नशेत असल्यानं धडपड जवळच्या नाल्यात कोसळला त्यामुळे जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे वाचा-महाराष्ट्र पोलिस कोरोनाच्या विळख्यात, बाधित पोलिसांची धक्कादायक आकडेवारी समोर
उपचारानंतर रुग्णालयातून निघताना त्याचं लक्ष पीपीसूटवर पडलं. त्याला तो रेनकोट वाटला आणि त्यानं पावसापासून संरक्षण करण्यासाठी तो चोरला. या तरुणानं आपल्या मित्रांना हा रेनकोट 1000 रुपयांना खरेदी केला असंही सांगितलं. जेव्हा तो सूट इतरांनी पाहिला तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती स्थानिकांनी आणि मित्रांनी आरोग्य विभागाला तातडीनं दिली. आरोग्य विभागानं चौकशी केल्यानंतर हा सूट चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली, त्यानंतर तरुणाची कोरोना चाचणी केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आल्यानं आता खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाचा धोका असल्यानं आता सगळ्यांच्या चाचण्या करण्यावर आरोग्य विभाग काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.