Home /News /maharashtra /

'पप्पा नका जाऊ...बाहेर कोरोना आहे' म्हणत पोलिसाच्या मुलाने फोडला हंबरडा, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणवतील

'पप्पा नका जाऊ...बाहेर कोरोना आहे' म्हणत पोलिसाच्या मुलाने फोडला हंबरडा, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणवतील

आसपासचे सगळेच लोक घरात आहेत, मात्र मग माझ्याच बाबांना का बाहेर जावं लागत आहे, असाच प्रश्न जणू हा चिमुकला आपल्या अश्रूंमधून विचारत असावा.

  मुंबई, 25 मार्च : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशातील प्रशासनापासून ते सामान्य नागरिकापर्यंत...प्रत्येकजणच चिंतेत आहे. हा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आावाहन करण्यात येत आहे. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन टाकली आहे तर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सूचना केली आहे. मात्र अशा स्थितीत एका घटकाला सुट्टी मिळणं तर दूरच पण त्यांच्यावरील कामाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढला आहे, तो घटक म्हणजे पोलीस. राज्य सरकारने आधी संचारबंदीची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी आता पोलिसांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. अशातच काही बेजबाबदार नागरिक सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांचं काम काहीसं जास्तचं वाढलं आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. ड्युटीवर निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून बघून त्याच्या मुलाने हंबरडा फोडल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. आसपासचे सगळेच लोक घरात आहेत, मात्र मग माझ्याच बाबांना का बाहेर जावं लागत आहे, असाच प्रश्न जणू हा चिमुकला आपल्या अश्रूंमधून विचारत असावा. 'बाळा...मला साहेबांचा फोन आला आहे. मी 2 मिनिटांत जाऊन येतो,' असं म्हणत हा पोलीस अधिकारी आपल्या लहानग्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र तरीही तो चिमुकला रडणं थांबवण्याचं नाव घेत नाही. 'मुंबई पोलीस अधिकाऱ्यांचा छोटा मुलगा पप्पा बाहेर नका जाऊ बाहेर कोरोना आहे..SALUTE POLICE', अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमााणात शेअर होत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक पोलिसांच्या कार्याला सलाम करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ नक्की मुंबईतीलच आहे की आणखी कुठला...याबाबतची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. 'न्यूज18 लोकमत' या व्हिडिओची आणि त्याबाबत करण्यात येत असणाऱ्या दाव्याची पुष्टी करत नाही.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Coronavirus, Mumbai police

  पुढील बातम्या