मालेगाव, 18 एप्रिल : मुंबई, पुणे यासांरख्या मोठ्या शहरांनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं आहे. लोकसंख्येचा विचार करता मालेगावात कोरोनाबाधितांचं प्रमाण मोठं आहे. अशातच आता प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. कारण पोलीस करत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिकेच्या सफाई कामगारांनी अघोषित कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. ओळखपत्र दाखवून देखील काही कामगारांना पोलिसांनी जबर मारहाण केली होती. अगोदरच शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना आता सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे प्रशासन सफाई कामगारांसोबत चर्चा करून काही तोडगा काढणार का, हे पाहावं लागेल. दरम्यान, काल आलेल्या आकडेवारीनुसार मालेगावात आतापर्यंत 60 पेक्षा अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झालेले 81 वर्षीय पुरुष डॉक्टर, तर 13 तारखेला मृत्यू झालेल्या 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हेही वाचा- पुण्यात डॉक्टरसह संपूर्ण कुटुंबालाच झाली कोरोनाची लागण, पोलीस कर्मचारीही निघाला पॉझिटिव्ह मालेगाव कारांची चिंता वाढवणारी स्थिती आहे. कारण शुक्रवारी एकाच दिवशी 14 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मान्य रुग्णालयातील साहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ .हितेश माहेल यांनी ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केलं असल्याने त्यांची नाराजी कशी दूर करता येईल, याबाबत प्रशासनाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







