सागर कुलकर्णी, मुंबई, 30 ऑक्टोबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारावरून थेट हायकमांडवर टीका केली होती. या वक्तव्याबाबत आता विजय वडेट्टीवार यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणूक आढावा बैठक झाली. या बैठकीत वड्डेटीवार यांनी हायकमांडबाबत व्यक्त केलेल्या मतांवरूनही चर्चा झाली. त्यानंतर वड्डेटीवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.
'हायकमांडने जास्त लक्ष दिले नाही त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा कमी आल्या,' अशी थेट टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती. वडेट्टीवार यांनी पक्षाच्या हायकमांडलाच टार्गेट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता त्यांना अखेर दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. वड्डेटीवार यांना यासंदर्भात विचारले असताना त्यांनी 'नो कमेंट' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांत विधानसभा निवडणुकांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान झालं. मतदानाआधी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु होता. भाजपच्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा तर तळ ठोकून होते. मात्र दुसरीकडे, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात एकही सभा घेतली नाही. एवढेच नाही तर प्रियांका गांधींही महाराष्ट्रात फिरकल्या नाहीत. सोनिया आणि प्रियांका कुठे आहेत, अशी चर्चा तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात झाली होती.
अजित पवारांनी केलं होतं तिरकस भाष्य
'काँग्रेसचं दिल्लीतील नेतृत्व जर महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते झाकोळून जातील. त्यामुळे या नेत्यांना संधी देण्यासाठीच दिल्लीतील नेते महाराष्ट्रात आले नसतील,' असं उपरोधीक भाष्य अजित पवार यांनी निवडणुकीदरम्यान केलं होतं.
VIDEO : 'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Vijay wadettiwar