पिंपरी चिंचवड, 25 जानेवारी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे 'आयर्न मॅन' म्हणून परिचित आहेत. तसंच त्यांना पोलीस दलातील सर्वात कणखर आणि खमका अधिकारी म्हणूनही ओळख जातं. मात्र एका तरुणीने त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि या आयर्न मॅनच्या आतील वडील जागृत झाला अन् त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
ज्या तरुणीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासमोर तिच्या भावना व्यक्त केल्या तिचं नाव ऋतुजा पाटील असून ती मूळची सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील जाशी गावाची रहिवाशी आहे. ऋतुजाच्या वडिलांना हृदयात छिद्र होतं. त्या आजारात त्यांचा मृत्यू झाला आणि ऋतुजाच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरवलं. ती पोरकी झाली.
मग बाबांच्या आठवणीत ऋतुजा लिहिती झाली आणि तिने "झुळूक" नावाचं पुस्तक लिहीत त्यामध्ये बाप नसलेल्या पौगंडावस्थेतील मुलींची काय अवस्था असते या बद्दल लिहिलं.
हेही वाचा - महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या मार्गांवर उद्यापासून मोठा बदल, 100 टक्के FASTag प्रणालीचा होणार वापर
तेच पुस्तक आज भेट देण्यासाठी ऋतुजा आपल्या आईसोबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे आली होती. त्यावेळी प्रकाश यांनी तिच्या बाबांबदलच्या भावना ऐकल्या आणि त्या भावाना व्यक्त करण्यासाठी ऋतुजाने लिहलेली कविता सादर केली तेव्हा कृष्ण प्रकाश यांच्यातील बाप जागृत झाला आणि हा कणखर माणूस ढसाढसा रडला.
पालकत्व स्वीकारले
या प्रसंगाबाबत कृष्ण प्रकाश यांना विचारलं असता त्यांनी आपणही एका मुलीचे वडील असल्याचं सांगत वडिलांविना मुलींची काय अवस्था होऊ शकते याची कल्पना केली आणि आपण भावुक झाल्याचं सांगितलं. त्याच बरोबर मुलगा-मुलगीमध्ये भेद करू नका आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या असं आहवानही त्यांनी केलं. विशेष म्हणजे ऋतुजाचं भविष्यातील शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घेत कृष्ण प्रकाश यांनी तिचं पालकत्वही स्वीकारलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.