मुंबई, 7 फेब्रुवारी : वरळीच्या कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीमध्ये माझ्याविरुद्ध निवडणुकीला उभं राहून दाखवावं. वरळी नसेल तर मी ठाण्यात तुमच्याविरुद्ध निवडणूक लढवायला तयार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं.
'काही जण सकाळी उठतात, खोके गद्दार बोलतात. काही लोक मला आव्हान देत आहेत. मी आमच्या लोकांना सांगितलं. मी छोटी-मोठी आव्हानं स्वीकारत नाही. मला जे आव्हान स्वीकारायचं होतं ते सहा महिन्यांपूर्वी पूर्ण केलं. जास्त इच्छा असेल तर महापालिका वॉर्डात उभे राहा,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
'मी जास्त बोलत नाही, मला काम करायचं आहे. मला कोणी तरी म्हणे आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो तेव्हा वरळीतून जाऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे वरळीतून एकटा गेला, हेलिकॉप्टरने गेला नाही. निवडणुका समोर ठेवून आम्ही काम करत नाही. केंद्राचं बजेट झालं, निवडणूक समोर ठेवून केलं म्हणे. जर दानत असती तर हे सगळं झालं नसतं,' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
'बीएमसी बजेट झाल्यानंतर काही लोक म्हणतात नगरसेवक नाही, मग कशाला निर्णय घेत आहेत. नगरसेवक नाहीत तर लोकांना सेवा द्यायच्या नाही का? हे बजेट सर्वसामान्यांसाठी होतं. हवेचं प्रदूषण, आरोग्य, शिक्षण सगळं आम्ही या बजेटमध्ये दिलं. काँक्रीटच्या रस्त्यामुळे अनेकांची दुकानं बंद होणार आहेत. लोकांना दिलासा मिळणार, म्हणून तुमची पोटदुखी आहे का? खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले, त्याचा हिशोब निवडणुकीमध्ये चुकता केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.
'बँकेतल्या फिक्स डिपॉझिटपेक्षा लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले तर चुकलं काय? मुंबई बाहेर गेलेल्या माणसाला मुंबईत आणण्याचं काम आम्ही करू, हा निवडणुकीचा मुद्दा करणार नाही. पुनर्विकासाचं काम आम्ही पूर्ण करणार,' असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीच्या नागरिकांना दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.