Home /News /maharashtra /

VIDEO : खेडमध्ये लहान मुलांचं भविष्य करपवण्याचा प्रयत्न, बेकरीत सुरू होती पिळवणूक

VIDEO : खेडमध्ये लहान मुलांचं भविष्य करपवण्याचा प्रयत्न, बेकरीत सुरू होती पिळवणूक

मानवी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेडमधील एका बेकरीत जाऊन हा प्रकार उघड केला आहे.

खेड, 31 जानेवारी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील (Khed) बेकऱ्यांमध्ये 15 वर्षाखालील लहान मुलांना (Child Labour) दिवसरात्र बेकरीचालक राबवून घेत आहेत. याबाबतचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून मानवी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेडमधील एका बेकरीत जाऊन हा प्रकार उघड केला आहे. उत्तर प्रदेशातील गोरगरीब कुटुंबातील या मुलांना वेठबिगारी प्रमाणे पैसे देऊन येथे आणले जाते आणि दिवसरात्र राबराब राबवले जाते. त्यांच्या पालकांना काही रक्कम देऊन मुलांना येथे आणून कामांसाठी जुंपले जात असल्याचा प्रकार यामुळे उघड झाला आहे. यामुळे सर्रास बालहक्क संरक्षण कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. या बेकरीत काम करणाऱ्या मुलांना अवजड कामे करायला लावली जातात तर त्यांना मारहाण देखील होते हे देखील समोर येत आहे. या संदर्भात मानवी हक्क संघटनेचे पदाधिकारी किरण तायडे यांनी स्वतः त्या बेकरीत जाऊन त्या ठिकाणी असलेली परिस्थिती आपल्या कॅमेऱ्यात टिपली. त्या मुलांशी चर्चा केली. ही मुले शिक्षणापासून देखील वंचित असल्याचे सांगण्यात आले. ही बाब अतिशय गंभीर असून तायडे यांनी स्थानिक प्रशासनाला आणि महिला व बाळ कल्याण विभागाचे मंत्री बच्चू कडू यांना निवेदन देखील दिले आहे. आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागून राहिले आहे. गुलशन शर्मा (वय 14 ,फरहान वय (17), अरमान (वय 14) या 18 वर्षाआतील मुलांना कामगार म्हणून राबवली जात असल्याची गंभीर बाब उघड झाली. मात्र या प्रकरणात बेकरी मालकाकडून उडवा उडवीची उत्तरे देऊन कोणती कारवाई करायची ती करा, अशी उद्धट उत्तर देखील संघटनेला देण्यात आली. या प्रकरणी मालक मुद्दसर उस्मान व महमद हनीफ कुरेशी यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे बेकरी चालवण्याचे कोणताही परवाना नसल्याची धक्कादायक बाब देखील उघड झाली. परवाना नसताना तसेच बेकरीमध्ये कोणतीही स्वच्छता नसल्याची बाबही निदर्शनास आली. या बेकरीमध्ये तयार करण्यात येणारे पाव, बटर टोस्ट तसेच अन्य खाद्यपदार्थ कोणतीही स्वच्छता न बाळगता बनवण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी बेकरी चालक खेळ करत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी बाल कामगार ठेवणे, तसंच परवाना नसताना अस्वच्छ स्वरूपात उत्पादन घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरी मालकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Child labour, Ratnagiri, Ratnagiri police

पुढील बातम्या