04 जुलै : 'देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे !' असे साकडं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे घातलं.
४ जुलै रोजी पहाटे २़२० वाजता आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, 'आळंदी ते पंढरी आणि देहू ते पंढरी पायी वारी म्हणजे सुख देणारा सोहळा असतो. वारकरी मजल दर मजल करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढीने झपाझप पाय टाकत पंढरीला येतात. भक्तीभावाने प्रेरित झालेली ही वारी असते. भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास पंढरीचा नक्कीच विकास होईल.'
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३०जूनपर्यंत मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या समितीत केवळ दोनच वारकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनेने केली आहे, मात्र ही समिती पूर्ण झाली नसून उर्वरित जागांमध्ये वारकऱ्यांचा नक्कीच समावेश केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.