जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शिर्डीकर नाराज, साईबाबांबद्दलचा 'हा' उल्लेख खटकला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शिर्डीकर नाराज, साईबाबांबद्दलचा 'हा' उल्लेख खटकला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शिर्डीकर नाराज, साईबाबांबद्दलचा 'हा' उल्लेख खटकला

शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार

  • -MIN READ
  • Last Updated :

हरिश दिमोटे,(प्रतिनिधी) शिर्डी, 15 जानेवारी: साईबाबांनी हयातीत कधीही जन्मस्थळ, जात, धर्म उघड केला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्हयातील पाथरीचा विकास करणार’ असा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्त नाराज झाले आहेत. यापूर्वी राष्ट्रपतींनी साईसमाधी शताब्दी सोहळ्यात साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. यावर नाराज झालेल्या शिर्डीकरांनी थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीच थेट साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. पाथरीच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पाथरी या गावाचा ‘साईबाबांचे जन्मस्थान’ असा उल्लेख करणे आक्षेपार्ह असल्याचे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे, असे शिर्डीकरांचे मत असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी शिर्डीकरांच्या या भावना जाणून घ्याव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासंबंधीची भूमिका गावकऱ्यांनी शनिवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. काय म्हणाले होते मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी साईबाबांचे जन्मगाव पाथरी असा उल्लेख करून पाथरीच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला असून लवकरच भूमिपूजन करणार असल्याची घोषणा केल्यावर शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. साईबाबांनी जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देऊन श्रध्दा आणि सबुरी हा मंत्र दिला. आयुष्यभर पडक्या मशिदीत राहून दीनदुबळ्यांची सेवा केली. साईबाबा कोणत्या जातीचे आहेत, ते कोठून आले याबाबत साईबाबांनी आपल्या हयातीत कोणाला सांगितले नाही. जे साईबाबांना मान्य नव्हते त्यावर चर्चाच नको हीच भूमिका आजवर साईभक्तांची राहिलेली आहे. बाबांविषयी अधिकृत माहिती साईसतचरित्रातच आहे. मात्र, मुख्यमंत्री साईभक्त असतानाही त्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करून परत नव्या वादाला जन्म घातल्याने साईभक्तांच्या संघर्षाचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात