मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हळद लागण्याआधीच मुलीसोबत भयंकर घडलं, लग्न घरात आक्रोश, सिल्लोडमधली धक्कादायक घटना

हळद लागण्याआधीच मुलीसोबत भयंकर घडलं, लग्न घरात आक्रोश, सिल्लोडमधली धक्कादायक घटना

दोन दिवसांवर लग्न, पण आनंदावर विरजण

दोन दिवसांवर लग्न, पण आनंदावर विरजण

तीन दिवसांवर तिचं लग्न होतं, पत्रिकाही वाटून झाल्या होत्या, बस्ता बांधून तयार होता, घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच मुलीसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sillod, India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

संभाजीनगर, 24 मार्च : तीन दिवसांवर तिचं लग्न होतं, पत्रिकाही वाटून झाल्या होत्या, बस्ता बांधून तयार होता, घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच मुलीसोबत धक्कादायक घटना घडली. संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अंघोळीला गेलेल्या 18 वर्षांच्या भावीवधूचा पाणी घेताना हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

लग्नघरात नवरदेवाची वरात येण्याऐवजी भावी नवरीची तिरडी उचलावी लागल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात वांगी खुर्द गावात हा प्रकार घडला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये शोककळा पसरली असून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव, असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे.

26 मार्चला पल्लवीचं लग्न होतं, त्यामुळे ती आनंदी होती. लग्नाआधी शुक्रवारी तिची हळद होती, त्यामुळे आवरून लवकर तयार होण्यासाठी ती अंघोळीला बाथरूममध्ये गेली, पण गरम पाणी घेत असतानाच तिला हिटरचा शॉक बसला, यामध्ये पल्लवीला जीव गमवावा लागला आहे. हिटरमुळे मृत्यू होण्याच्या घटना मागच्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत, त्यामुळे हिटरच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

सोलापूरच्या बार्शीमध्येही अशीच काहीशी घटना घडली आहे. डीपीवर काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. 15 दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता, तसंच दोन महिन्यांनी त्याचं लग्न होणार होतं. शॉक लागल्यानंतर वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह डीपीवरच लटकलेल्या अवस्थेत होता. निलेश रामभाऊ होनराव असं मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्यांचं नाव आहे.

बार्शी तालुक्यातील मालवंडी शिवारात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रोहित्रावर निलेश चढला होता. तो  कंत्राटी कामगार म्हणून वीज वितरण कंपनीत काम करत होता. मलवंडी गावातील पाटील म्हात्रे यांच्या शेतातील विद्युत रोहित्रावर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करत होता मात्र अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. निलेशला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याचा मृतदेह डीपीवरच लटकून राहिला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

First published:
top videos