अपूर्वा तळणीकर छत्रपती संभाजीनगर, 15 मे : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यात शेतपिकांचे मोठ नुकसान झालंय. त्याचबरोबर पक्षांना सुद्धा या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे. यामुळे मोठया प्रमाणात पक्षी हे मरण सुद्धा पावले असून पक्ष्यांच्या घरटी विणीच्या हंगामाची साखळीही विस्कळीत झाल्याचे मत छत्रपती संभाजीनगर मधील पक्षी अभ्यासकांनी नोंदवले आहे. विणीच्या हंगामाची साखळी विस्कळीत हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या एप्रिल-मे महिन्यात गेल्या 65 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या माऱ्यातून पिके तर उद्धवस्त झालीच, शिवाय पक्षीजीवनही उघड्यावर आले आहे. पावसाळ्यापूर्वी निवारा बांधण्याच्या कामाला सुरुवात केलेल्या अनेक देशी पक्ष्यांची घरटी मोडून पडली. थव्यांनी अधिवास करणारे पक्षी मृत्युमुखी पडले. तर विणीच्या हंगामाची साखळीही विस्कळीत आहे.
पक्ष्यांवर परिणाम बुलबुल, रॉबिन, चिमणी, लोसिंग डोह (परवा), इंडियन पिटा, ट्री स्विफ्ट, रातवा, सुबग अशी काही पक्षी ही पावसाळ्यापूर्वी म्हणजे मार्च, एप्रिल, मे महिन्यापासून झाडांवर किंवा अन्यत्र घरटी बांधायला सुरुवात करतात. टिटवी हा पक्षी उघड्यावर अंडी देतो. साळुंक्या, पोपट, बगळे हे थव्यांनी रात्रीच्यावेळी एका झाडावर मुक्कामी थांबतात. त्यांच्या एकूणच जीवनमानावर सध्याच्या अवकाळी गारपिटीच्या हवामानाचा परिणाम झाला. अनेक पक्षी गारपिटीच्या माऱ्यामुळे मृत्युमुखी पडले. पक्षीही भ्रमित मोसमीपूर्व पावसामुळे बुलबुल, रॉबिन,चिमणी, लोसिंग डोह (परवा), इंडियन पिट्टा, ट्री स्विफ्ट, रातवा, सुबग यासारख्या पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाची साखळी विस्कळीत झाली आहे. रातवा हा मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला अंडी देतो. परंतु पावसामुळे आत्ताच त्यांची अंडी दिसून आली. अवकाळीने पक्षीही भ्रमित झाल्यासारखे दिसत आहेत, असं पक्षी अभ्यासक कुणाल विभांडिक यांनी सांगितले.