छत्रपती संभाजीनगर, 26 जून : सध्याच्या घडीला गोठ्यात बांधलेली दोन-चार जनावरं पाळणंही लोकांना आता कठीण जातं. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असा एक शेतकरी आहे. जो थोड्या-थोडक्या नाही तर 120 भाकड गायी सांभाळत आहे. गावोगावी सोडून दिलेल्या भाकड गाईंना जमा करून या शेतकऱ्याने गोशाळा उभारली आहे. सध्या या शेतकऱ्याला चाऱ्यासाठी मदत हवी आहे. कधी झाली सुरुवात? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारूंडी गावातील परमेश्वर नलावडे हे भाकड गाईंचा संभाळ करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. परमेश्वर नलावडे हे 2012 पासून स्वखर्चाने पारसनाथ गोशाळा चालवतात. अनेक संकटाचे दिवस परमेश्वर नलावडे आणि त्यांच्या कुटुंबाने पाहिले मात्र गोशाळाचे काम त्यांनी अविरत चालू ठेवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून परमेश्वर नलावडे आणि त्यांचे कुटुंब ही गोशाळा स्वखर्चाने चालवतात. पहाटे पाच वाजल्यापासून गोशाळेत नलावडे कुटूंब व्यस्त असतं. आई, वडिल, दोन मुलं, पत्नी, भाऊ, भावजाई आणि दोन मजूर या गोशाळेत कायम सेवेत असतात. मोसंबी बाग दिली सोडून या नलावडे कुटुंबाची शेती ही गोशाळे लगतच मोसंबीची बाग आहे. त्यात त्यांनी सहा वर्षांपूर्वी 800 मोसंबीची झाडे लावली होती. ती यंदा फळाला आले होते. त्या झाडांसाठी विहिरीतून पाणी होते. परंतु यावर्षी पाऊसाचे आगमन वेळेवर न झाल्याने विहिरीची पाणी पातळी खोल गेली परिणामी पाणी कमी झाले. त्यामुळे गाईंना पाणी कमी पडू नये म्हणून त्यांनी आपल्या फळाला आलेल्या मोसंबीच्या झाडांना पाणी न देता या गाईंना पाणी पिण्यासाठी वापरले. त्यामुळे 1 महिन्यांपासून मोसंबी बागेला पाणी दिले नाही म्हणून फळाला आलेली बाग करपून गेली आहे.
चाऱ्यासाठी पुढाकार घ्यावा यंदा विहिरीत पाणी कमी असल्यामुळे चाऱ्याचे भलं मोठं संकट उभे राहिले आहे. एक ते दोन दिवस पुरेल एवढाच चारा या गोशाळेत शिल्लक आहे. चाऱ्याच्या किंमतीही दुपटीने वाढल्या आहेत. चाऱ्यासाठी प्रशासनानं, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने पुढाकार घ्यावा, असं आवाहन परमेश्वर नलावडे यांनी केले आहे.