छत्रपती संभाजीनगर,17 जुलै : महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणााऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आलीय. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षांसाठी खेळाडू आणि मार्गदर्शक यांना हे पुरस्कार जाहीर झालेत. छत्रपती संभाजीनगरच्या वैदेही लोहिया हिला हा पुरस्कार जाहीर झालाय. तलवारबाजी या फारशा प्रचलित नसलेल्या खेळात वैदेहीनं ही कामगिरी केलीय. कसा झाला वैदेहीचा प्रवास? मुळची छत्रपती संभाजीनगरची असलेल्या वैदेहीचे वडील व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. वैदेहीला लहानपणापासूनच वाचन आणि खेळाची आवड होती. लहाणपणी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक वाचताना तिला शस्त्रांबद्दल आवड निर्माण झाली. वैदेहीला पाचवीमध्ये शाळेतल्या क्रीडा शिक्षक रूपा शर्मा यांनी तलवारबाजीबद्दल माहिती दिली. तेव्हा तिनं तलवारबाजीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
50 मेडल आणि… वैदेही रोज सहा तास तलवारबाजीचा कसून सराव करते. तिनं आत्तापर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. ती चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली असून त्यामध्ये तीन एशियन चॅम्पियनशिप आणि एका वर्ल्डकपचा समावेश आहे. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत वैदेहीनं ब्राँझ मेडलची कमाई केलीय. तसंच वेगवेगळ्या स्पर्धेत 50 पेक्षा जास्त मेडल आणि 20 पेक्षा जास्त ट्रॉफी मिळवल्यात. ‘शिवछत्रपती पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. या पुरस्काराचे सर्व श्रेय आई-वडील आणि माझ्या शिक्षकांना जातं. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरस्कार मिळाला याबद्दल आनंद आहे. इथंच न थांबता भविष्यामध्ये देशात प्रतिनिधित्व करून ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावण्याचं माझं ध्येय आहे त्या दृष्टीने माझी तयारी सुरू आहे, अशी भावना वैदेहीनं व्यक्त केलीय. तुम्हाला माहितीये स्वस्तात मस्त ई-व्हेईकल कशी बनते? वैदही लहानपणापासून अभ्यास आणि खेळामध्ये पुढे आहे लहानपणापासून तिने शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधलंय. चिकाटी आणि सातत्यामुळे तिनं हा पुरस्कार मिळवलाय. आम्हाला वैदहीचा अभिमान वाटतो, असं मत वैदेहीच्या आई कविता लोहिया यांनी व्यक्त केलं.