अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 26 मार्च : काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले. यानंतर छत्रपती संभाजीनगरचं वातावरण चांगलचं तापलं होतं. केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने एमआयएमने रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. तर दुसरीकडे भाजपकडूनही याविरोधात मोर्चे काढण्यात आले. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि एमआयएमवर गंभीर आरोप केले आहेत. "एमआयएम आणि भाजपचे लागेबांधे असून यांचा शहरात दंगल घडवण्याचा कट होता" असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
एमआयएम आणि भाजपचे लागेबांधे : दानवे
एमआयएम आणि भाजपचे लागेबांधे आहे, यांचा शहरात दंगल घडवण्याचा कट होता आणि अजुनही आहे हे मी जबाबदारीने बोलतो. तु मारल्यासारखे कर मी मेल्यासारखे करतो असं भाजप आणि एमआयएम करतात, हे मोठं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नामांतर झाल्यानंतर एमआयएमने आंदोलन केले तर भाजपने मोर्चा काढला या दोघांचे लागेबांधे आहेत. एमआयएम म्हणजे भाजपची बी टीम आहे. तसेच एमआयएम कधीही स्वतः जिंकण्यासाठी नाही तर भाजपला जिंकण्यासाठी निवडणूका लढतात असे वक्तव्य देखील अंबादास दानवे यांनी केलं.
वाचा - उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येतील का? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान
नामांतरावरुन राजकारण तापलं
नामांतराच्या निर्णयाला एमआयएमने विरोध केल्यावर मनसेकडून जलील यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जलील रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असतील, तर आम्ही देखील आंदोलन करुन उत्तर देऊ असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला होता. दरम्यान जलील यांनी उपोषणाची घोषणा करताच मनसेकडून देखील स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली.
नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरवात झाली होती. मात्र याच उपोषणाच्या ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर झळकवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. एक तरुण हातात औरंगजेबाचा पोस्टर घेऊन उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाला. पाहता-पाहता याठिकाणी जिंदाबाद जिंदाबाद औरंगाबाद जिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे इतर तरुणांनी जल्लोष सुरु केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मात्र जलील यांनी या तरुणाचा एमआयएम पक्ष उपोषणाशी कोणतेही संबध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर आंदोलनाला बदनाम करण्यासाठी असे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chhatrapati Sambhaji Nagar, MIM