सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती अवघ्या काही तासांवर आली आहे. देशभरामध्ये ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वेगवेगळ्या उपक्रम राबवून प्रत्येक आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करत असतो. यावर्षी छत्रपती संभाजीनगर शहरातील आंबेडकरी अनुयायाने अनोख्या पद्धतीनं त्यांना अभिवादन केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झालं. लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी ‘जब तक सुरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब आपका नाम रहेगा,’ अशी घोषणा देण्यात आली होती. आता 67 वर्षानंतर बाबासाहेबांचं नाव अवकाशातील एका ताऱ्याला देण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील भीमसैनिकानं हा तारा विकत घेतला असून त्याचे रजिस्ट्रेशनही झालं आहे.
कशी केली नोंदणी? संभाजीनगर महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी अवकाशातील तारा विकत घेतलाय. त्याची बाबासाहेबांच्या नावानं नोंदणी करण्यात आलीय. अमेरिकेतील इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेच्या 9 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज केला होता. त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती संस्थेला पुरवण्यात आली होती. त्यानंतर ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. त्याबाबतचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं राजू शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे 14 एप्रिल रोजी अँड्रॉइड आणि अॅपल युजर्स मोबाईल लॅपटॉपवर हा तारा फक्त येऊ शकणार आहे. सोलापूरकरांनी 77 वर्षांनंतरही जपल्या आहेत बाबासाहेबांच्या ‘त्या’ आठवणी, पाहा Video असा बघा बाबासाहेबांच्या नावाचा तारा…. 14 एप्रिल रोजी हा तारा प्रत्येक आंबेडकरी अनुयायाला बघता येणार आहे. यासाठी मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग एप्लीकेशन डाउनलोड करून एप्लीकेशन मध्ये रजिस्ट्री चा नंबर CX26529US क्रमांक टाकून तुम्ही बघू शकता. तसेच द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाईंडर थ्रीडी स्मार्टफोन एपअँड्रॉइड अँड आयओएस वरून देखील हा तारा बघता येईल,’ अशी माहिती राजू शिंदे यांनी दिली. ‘डॉ.बाबासाहेबांच्या नावाने अनेक वर्षांपासून ही घोषणा देण्यात येत होती. मात्र यावर्षी अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निश्चय आम्ही केला होता. त्यासाठी प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेबांच्या नावाने अवकाशातील एक स्टार रजिस्ट्री झाल्याने बाबासाहेबांना एक प्रकारे अभिवादन केलंय,’ अशी भावना राजू शिंदे यांनी व्यक्त केली.